कोल्हापूर ( प्रतिनिधी ) :कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटल म्हणजेच सीपीआरसाठी एमआरआय मशीनची मागणी पूर्ण झाली आहे. या मशिनरीसह अन्य आनुषंगिक कामांसाठी २६ कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. या नव्या मशिनरीमुळे दर महिन्याला १२५ ते १५० रुग्णांच्या कुटुंबीयांचे प्रत्येकी आठ ते दहा हजार रुपयांप्रमाणे लाखो रुपये वाचणार आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सीपीआरला संलग्न करून २३ वर्षे पूर्ण झाली. मेंदू, हृदय, फुफ्फुस, हाडांसह शरीराच्या सर्वच अवयवांच्या काही आजारांची सूक्ष्म स्थिती सीटी स्कॅन यंत्रणेच्या माध्यमातूनही स्पष्टपणे दिसत नाही. त्यामुळे सीपीआरमध्ये येणाऱ्या रुग्णांना एमआरआयची गरज लागल्यास खासगी केंद्रातून एमआरआय करून घ्यावे लागायचे. यासाठी प्रत्येक रुग्णा पाठीमागे साधारणता आठ ते दहा हजार रुपये खर्च यायचा. सीपीआरमध्ये येणारे जिल्ह्यातील बारा तालुक्यांसह कर्नाटक, कोकणातील सर्वसामान्य रुग्णांना हा एमआरआयचा खर्चही सोसत नव्हता. त्यामुळे ही मशिनरी सीपीआरमध्ये बसवावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती.

पालकमंत्री मुश्रीफ यांनी गेल्यावर्षी या खात्याचा कार्यभार हाती घेतल्यानंतर ही यंत्रणा बसवण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार त्यांनी सीपीआरमध्ये ही यंत्रणा बसवण्यासाठी महाविद्यालयाकडून प्रस्ताव मागवून घेतला होता. त्यावर प्रशासकीय प्रक्रिया होऊन मंगळवारी २६ कोटी रुपयांचा हा शासन आदेश निघाला आहे. याची सर्व निविदाप्रक्रिया होऊन यंत्रणा बसवण्यासाठी किमान चार महिने लागणार आहे.

याबाबत सीपीआरचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे म्हणाले, सीपीआरच्या रेडिओलॉजी विभागामध्ये या मशीनसाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. त्यासाठी आवश्यक तंत्रज्ञ उपलब्ध आहेत. लवकरात लवकर ही सुविधा सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

सीपीआरसाठी मंजूर झालेली ३ -टेस्ला एमआरआय मशीन अत्याधुनिक आहे. एमआरआयच्या यंत्रसामग्रीतील हे सर्वांत उत्तम दर्जाचे मशीन मानले जाते. त्यामुळे मोठ्या आजारांसह रुग्णांच्या आजाराची सूक्ष्म स्थिती अचूकपणे कळण्यास मदत होणार आहे. साहजिकच लवकरात लवकर अचूक निदान आणि उपचार होण्यास मदत होणार आहे.

अत्याधुनिक यंत्रसामुग्री……..!

या मशीनद्वारे मेंदूसह ऋदय, पोट, फुफ्फुस, हाडे यांचे एमआरआय करता येतील. खाजगी केंद्रांवर एमआरआयची फी आठ ते दहा हजार रुपये आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून ही सुविधा मोफत मिळणार आहे. जे रुग्ण वाढीव उत्पन्न मर्यादेमुळे या मोफत योजनेत बसणार नाहीत त्यांना सरकारी अवघ्या दीड हजार रुपये दरात ही सेवा उपलब्ध होई