शाहूवाडी ( प्रतिनीधी ) गोगवे ता. शाहुवाडी येथे शेतात बकरी बसवली होती. यावर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात तब्बल वीस बकरी ठार झाली आहेत. यामुळे सुमारे दीड ते दोन लाख रुपये नुकसान झाले आहे.

याबाबत घटनास्थळावरून स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गोगवे ता. शाहुवाडी येथील आनंदा केशव पाटील यांच्या टेकावरील शेतात बांबवडे, सोनवडे व डोणोली येथील मेंढपाळ संजय बंडगर, विलास मुंडरे, बाळू वग्रे, अवघड वग्रे, काशिनाथ जानकर, यांची बकरी ब होती. काल सायंकाळी सहाच्या दरम्यान बिबट्याने हल्ला करून वीस बकऱ्यांना ठार केले आहे.

या घटनेची माहिती वन विभागाला कळताच वन अधिकारी अमित भोसले व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला असून यामध्ये मेंढपाळ बांधवांचे सुमारे दीड ते दोन लाख रुपये नुकसान झाले आहे. शाहूवाडी तालुक्यात बिबट्याच्या होणाऱ्या सततच्या हल्ल्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने त्वरित बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.