कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर शहरातील 100.33 कोटींच्या 16 रस्त्यांचा शुभारंभ पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आज मिरजकर तिकटी येथे पार पडला. यामध्ये 16.68 कि.मी. चे 16 मुख्य रस्ते करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांनी यावेळी बोलताना सांगितले.

यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले सर्व लोकप्रतिनिंधी एकत्र मिळून शहराच्या विकासासाठी लागणारा निधी आणण्यासाठी प्रयत्न करु. थेट पाईपलाइनचे स्वप्न पूर्ण झाले. त्यातील तांत्रिक अडचणी दूर करुन येत्या काळात मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थित भव्य लोकार्पण कार्यक्रम घेणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

पुढील जिल्हा नियोजनच्या आराखड्यातून अंबाबाई मंदिर विकास आराखड्यासाठी 100 कोटी मिळतील. यातून अंबाबाई मंदिर परिसराचा विकास होईल. श्री अंबाबाई मंदिर, जोतिबा आणि नृसिंहवाडी येथील नियोजित कामे पूर्ण झाल्यास जिल्ह्यात 10 पट भाविक व पर्यटक वाढतील. देशातील नंबर एकचे कोल्हापूर करुन ते उत्कृष्ट आणि आदर्शवत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार श्रीमती जयश्री जाधव, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, केशव जाधव, शहर अभियंता हर्षजीत घाडगे, प्रा.जयंत पाटील, विजय जाधव, आदिल फरास, राजेश लाटकर, सत्यजित कदम, सुजित चव्हाण, महेश जाधव, राहुल चिकोडे, राहूल चव्हाण, मुरलीधर जाधव, विलास वास्कर यांच्यासह माजी नगरसेवक व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.