कोल्हापूर (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना कसबा बावडा विभागाच्या वतीने “लोकनाथ चषक” टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये अंतिम सामन्यात थरारक विजय मिळवत कसबा बावड्याच्या नवनाथ मित्र मंडळ प्रणित झेंडा चौकाने सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपदावर मोहर उमटवली.

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना पक्षाच्यावतीने कसबा बावडा विभागातर्फे “लोकनाथ चषक” भव्य जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेचा अंतिम सामना नवनाथ मित्र मंडळ प्रणित झेंडा चौक विरुद्ध कै. शहाजी मासाळ स्पोर्ट्स मुंबई यांच्यात प्रकाश झोतात रंगला. या सामन्यात नवनाथ मित्र मंडळ प्रणित झेंडा चौक संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्विकारली.

प्रथम फलंदाजी करताना कै.शहाजी मासाळ स्पोर्ट्स मुंबई संघाला ७ षटकांमध्ये ८ गडी बाद ३७ धावा बनविता आल्या. उत्तरादाखल खेळताना नवनाथ मित्रमंडळ प्रणित झेंडा चौक स्पोर्ट्स संघाने स्फोटक फलंदाजी करत २ गड्यांच्या मोबदल्यात ३.१ षटकात धावांचे आव्हान पूर्ण करून “लोकनाथ चषक” काबीज केला. विजेत्या संघास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी श्री.राजेश क्षीरसागर आणि युवा सेना सचिव पूर्वेश सरनाईक यांच्या हस्ते “लोकनाथ चषक” आणि १ लाख रुपयांचे बक्षीस प्रदान करण्यात आले.

तर उपविजेता कै.शहाजी मासाळ स्पोर्ट्स मुंबई संघास युवा सेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर, जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण व शिवसेना शहर समन्वयक सुनील जाधव यांच्या हस्ते उपविजेता चषक आणि ५० हजार रूपये बक्षीस देण्यात आले.

यावेळी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, उत्तर शहरप्रमुख रणजीत जाधव, उदय भोसले, किशोर घाटगे, शहर समन्वयक सुनील जाधव, जिल्हा नियोजन समिती सदस्य अंकुश निपाणीकर, उपशहरप्रमुख रोहन उलपे, विराज खाडे, सुरज सुतार, उत्तम रंगापुरे आदी उपस्थित होते.