कोल्हापूर (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विशेष लक्ष देत अवघ्या दोन दिवसात खासदार धैर्यशील माने यांच्या निवडणूक प्रचाराचे महायुतीच्या सर्व नेत्यांना घेऊन यशस्वी नियोजन मार्गी लावले.

महायुतीचे सहयोगी आमदार प्रकाश आवाडे यांच्याशी यशस्वी शिष्टाई व आमदार विनय कोरे सावकार आणि माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना सर्व शक्तीनिशी माने यांच्यासाठी मैदानात उतरवल्याने खा. माने यांची लोकसभेची वाट सुकर झाल्याचे चित्र अर्ज दाखल करताना दिसून आले.

खासदार धैर्यशील माने यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मंत्री चंद्रकांतदादा पाटील पालकमंत्री हसन मुश्रीफ आमदार विनय कोरे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर माजी मंत्री सदाभाऊ खोत खासदार धनंजय महाडिक आमदार प्रकाश आवाडे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. एकच वादा धैर्यशील दादा अशा गगनभेदी घोषणांनी मिरवणूक मार्ग दणाणून गेला होता.

विशेष म्हणजे मतदारसंघातील तरुणाईमध्ये आजही खासदार धैर्यशील माने यांची क्रेझ असल्याचे उमेदवारी अर्ज दाखल करताना दिसून आले. डोक्यावर भगवी टोपी हातात भगवा ध्वज, धैर्यशील माने यांच्या फोटोचे बॅनर आणि गळ्यात धनुष्यबाणाचा स्कार्फ घालून मोठ्या संख्येने तरुण वर्ग मिरवणुकीत सहभागी झाला होता. डोक्यावर आग ओखणारे ऊन असूनही तरुणाई मध्ये सळसळता उत्साह पाहायला मिळाला.

विरोधी आघाडीचे उमेदवार शाहूवाडीतील असल्यामुळे येथून कसा प्रतिसाद मिळतो याकडे राज्यकर्त्यांची लक्ष वेधले होते. परंतु अनेकांचे अंदाज फेल ठरवत आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर यांनी शाहूवाडी पन्हाळ्यात फिल्डिंग टाईट केल्याचे दिसून आले. या मतदारसंघातून जनसुराज्यचे घर टू घर कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले होते.

शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर काय करणार याची चर्चा गेली पंधरा दिवसापासून सुरू होती. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर अर्ज भरण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी फौज घेऊन ते दाखल झाले होते.तर वाळवा, शिराळा मध्येही असेच चित्र पाहायला मिळाले. शिराळ्यातून आणि वाळव्यातून भाजपा शिवसेना राष्ट्रवादी रयत क्रांती महायुती मित्रपक्षाचे हजारो कार्यकर्ते अर्ज भरण्यासाठी आले होते.

राज्याच्या राजकारणाचे लक्ष वेधलेल्या इचलकरंजीतून मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. आमदार प्रकाश आवाडे यांची यशस्वी शिष्टाई झाल्यानंतर ताराराणी पक्षासह भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेशराव हळवणकर समर्थक खासदार धैर्यशील माने यांच्यासाठी एकवटल्या असून इथून मोठे बळ मिळणार आहे.