सांगली/प्रतिनिधी : सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये नाराजी नाट्य सुरु आहे. अनेक दशकांपासून कॉंग्रेसकडे असणारी जागा शिवसेना शिंदे गटाकडे गेल्याने नाराज झालेल्या विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. पण विशाल पाटील यांनी माघार घ्यावी यासाठी कॉंग्रेस पक्ष श्रेष्ठींकडून माघारीसाठी प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे विशाल पाटील दबावाला बळी पडतील की नाही हे आज (22 एप्रिल) दुपारी ३ वाजेपर्यंत कळणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज अंतिम मुदत आहे.

ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना सुरक्षित विजय मिळवून देण्यासाठी डावपेच खेळले जात असले तरी, भाजपचे दोन वेळा खासदार संजयकाका पाटील यांच्याविरुद्ध विजय मिळवण्यासाठी स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांमधील नाराजी हा मोठा अडथळा आहे. चंद्रहार हे सुरुवातीपासून शिवसैनिक नाहीत त्यामुळे तो योग्य पर्याय नाही, असे त्यांचे मत आहे. मात्र, ठाकरेंनी यासाठी ठाम नकार दिला आहे.

जनसंपर्क कार्यालयाचे नाव बदलले
दरम्यान, विशाल पाटील यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी कॉंग्रेस नेते प्रयत्न करत आहेत. यातच काँग्रेस भवनजवळ विशाल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे नाव बदलले असून वसंतदादा भवन असे नामकरण करण्यात आल्याने भूवया उंचावल्या आहेत. वसंतदादा भवन असे नामकरण करत वसंतदादांचा एक फोटो देखील कार्यालयाबाहेर लावला गेला आहे.

सांगली लोकसभेसाठी अर्ज माघार घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे लोकसभेच्या मैदानातून काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील हे माघार घेणार का? की आपली बंडखोरी कायम ठेवणार? याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदत आहे, त्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून विशाल पाटलांनी अर्ज माघार घेण्याबाबत दबाव देखील टाकण्यात येण्याची शक्यता आहे. पक्षातून निलंबनाचा इशारा देखील देण्यात आल्याचे बोलल जात आहे.

प्रतिक पाटील यांना राहुल गांधी यांचा फोन
विशाल पाटील यांनी माघार घ्यावी यासाठी शिवसेनेसह कॉंग्रेस नेतेही प्रयत्न करत आहेत. कॉंग्रेस कडून तसा दबावही विशाल पाटील यांच्यावर आणला जात आहे. तर विशाल पाटील यांचे बंधू प्रतिक पाटील यांना थेट राहुल गांधी यांचा फोन आल्याचे बोलले जात आहे. राहुल गांधी यांनी प्रतिक पाटील यांना फोन करून विशाल पाटलांना माघार घ्यायला लावावी अशी विनंती केल्याचे बोलले जात आहे. त्याच बरोबर विशाल पाटील यांना राज्यसभेवर घेण्याचे आश्वासनही देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दुपारी तीननंतरच चित्र स्पष्ट होणार
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यापासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विशाल पाटील आपला अर्ज मागे घेतील, असा विश्वास देखील व्यक्त केला आहे. त्यामुळे आता विशाल पाटील आपला उमेदवारी अर्ज माघार घेणार का? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. मात्र, विशाल पाटील आपल्या भूमिकेवर ठाम असून ते लोकसभा निवडणूक लढवतील, असा विश्वास विशाल पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. तथापि, दुपारी तीननंतरच सांगली लोकसभेच्या आखाड्याचे खरं चित्र स्पष्ट होणार आहे. दुसरीकडे, विशाल पाटील यांच्यासाठी सांगली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमदार विश्वजीत कदम यांचे निकटवर्तीय आमदार विक्रम सावंत यांनी काँग्रेस आघाडीचा धर्म पाळणार हे विधान शर्यतीतून माघार घेण्याचा इशारा मानला जाऊ शकतो.

राज्यसभेची जागा देण्याचे आश्वासन
चंद्रहार पाटील यांच्या नामांकनासाठी सावंत यांच्या उपस्थितीनंतर आम्ही परिस्थितीचे मूल्यांकन करत आहोत. बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आमच्याकडे संपर्क साधला आहे. ठाकरे गटाकडून विशाल पाटील यांना राज्यसभेची जागा देण्याचे आश्वासन दिले आहे, मात्र काँग्रेस गप्प आहे, अशीही चर्चा आहे. लोकांकडून भावनिक प्रतिसाद मिळत असताना त्यांनी आपली शक्ती दुसऱ्या उमेदवारासाठी लढण्यात कशाला खर्च करावी, असे मत विशाल पाटील यांच्या समर्थकांनी जोरदारपणे मांडले आहे.
विशाल पाटील यांच्या समर्थनार्थ भावनेची तीव्र लाट आहे. जर त्यांनी माघार घेतली तर ती राजकीय आत्महत्या असेल, असे त्यांच्या एका समर्थकाने सांगितले. दुसरीकडे, काँग्रेसमध्ये असा एक वर्ग आहे जो विशाल यांच्या भूमिकेपेक्षा वेगळा आहे. आम्ही सर्वजण काँग्रेससाठी जागा मिळवण्यासाठी लढलो, परंतु विशिष्ट उमेदवारासाठी नाही आणि त्यामुळे आमच्यासाठी पक्षाची पायरी महत्वाची असल्याचे एका काँग्रेस कार्यकर्त्याने म्हटले आहे.