कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहरातील सीबीएस स्टँड ते राजारापुरी या मार्गावर पायी ये-जा करण्यासाठी पर्याय नाही. त्याचा विचार करून पादचारी उड्डाण पूलासाठी (फूट ओव्हर ब्रीज) ३ कोटी ८२ लाख निधी मंजूर झाला आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ९ मार्चला कामाचे भुमिपूजनही झाले. मात्र, एक महिना उलटला तरीही अद्याप कामाला सुरूवात झालेली नाही. त्यामुळे एखादा बळी देऊनच ठेकेदार कंपनी काम सुरू करणार आहे का..? असा संतप्त सवाल शिवसेना ठाकरे गट महिला आघाडीच्या कोल्हापूर शहरप्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.

प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, परिख पुलाखालुनच वाहनांच्या गर्दीत जीव धोक्यात घालून नागरीक-ये-जा करत आहेत. त्यामुळे एखादा बळी देऊनच ठेकेदार कंपनी काम सुरू करणार आहे का ? महापालिका प्रशासनानेही झोपेचे सोंग का घेतले आहे ?, असा संतप्त सवाल प्रतिज्ञा उत्तुरे यांनी उपस्थित केला आहे.

तसेच कांही वर्षापूर्वी रेल्वे विभागाने मोठी भिंत उभारली आहे. सीबीएस स्टँड ते राजारामपुरी या मार्गावर पायी ये-जा करणार्यांची कुचंबना झाली आहे. नोकरी-व्यवसायाठी नागरीक आणि शाळा-कॉलेजसाठी विद्यार्थी असे दररोज सुमारे २० ते २५ हजार नागरीक परिख पुलाखालून ये-जा करीत आहेत. मात्र, परिख पुलाखालून हजारो वाहनेसुध्दा जात असतात. त्यातूनच वाट काढत नागरीक कसेबसे जीव मुठीत घेऊन ये-जा करत आहे.

महापालिकेने २०१३ मध्ये पादचारी उड्डाण पुलासाठी सुमारे दीड कोटींचा प्रस्ताव केला होता. परंतू उंचीचे कारण दाखवून रेल्वे खात्याने प्रस्ताव नामंजूर केला. आता त्याची किंमत सुमारे ४ कोटी झाली आहे. जिल्हा नियोजन समितीमधून एस. टी. स्टँडकरून राजारामपुरीकडे ये-जा करण्यासाठी लोखंडी उड्डाण पूल बांधण्यासाठी ३ कोटी ८८ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. रेल्वे विभागानेही त्याला मंजुरी दिली आहे.

५४ फूट लांबीचा आणि सुमारे साडेतीन फूट रूंदीचा हा पादचारी उड्डाण पूल आहे. त्याची उंची सुमारे पावणेसहा मीटर इतकी आहे. काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराला सहा महिन्याची मुदत आहे. मात्र त्यातील एक महिना असाच बिनकामाचा गेला. आता दोन महिन्यानंतर पाऊस सुरू होईल. मग पादचारी उड्डाण पूलाचे काम पूर्ण होणार कधी? महापालिका प्रशासनाने ठेकेदाराकडून तत्काळ काम सुरू करून पूर्ण करून घ्यावे. कोल्हापूर शहराचा उत्तर-दक्षिण भाग जोडण्यासाठी हा पादचारी उड्डाण पूल महत्वाचा ठरणार आहे, असेही प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.