मुंबई : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून लोकसभा निवडणुक लढवण्याची चिन्हं आहेत. तसं झाल्यास पिता-पुत्र एकाच वेळी लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरण्याचा हा दुर्मिळ योगायोग असेल.

सुजात आंबेडकर हे वंचितमधीलतील युवा आघाडीची धुरा सांभाळतात. गेल्यावेळी वय कमी असल्याने ते लोकसभा लढवू शकले नव्हते, परंतु आता ते रिंगणात उतरुन दक्षिण मध्य मुंबईतून निवडणूक लढवण्याची चर्चा आहे. परंतु यास अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. वंचित बहुजन आघाडी दक्षिण मध्य मुंबईतून उमेदवार देण्याचं कारण म्हणजे या भागात असलेले दलित – बहुजन मतदारांचं प्राबल्य. इथे सध्या १६ टक्के दलित-बहुजन, तर २३ टक्के मुस्लिम मतदार आहेत. दलित समाजाचे प्रामुख्याने चेंबूर, वडाळा भागात वास्तव्य आहे. तर मुस्लिम समाज चेंबूर, अणुशक्तीनगर या भागात मोठ्या प्रमाणात आहे. या दोन मोठ्या समाजांचे जातीय समीकरण पाहता सुजात येथून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीत सहभागाच्या शक्यता मावळल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून खुद्द प्रकाश आंबेडकर निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र त्यांनी गेल्या वेळीप्रमाणे पुन्हा एकदा अकोला मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरायचं ठरवलं आहे.