मुंबई – आषाढी एकादशीला महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी अक्खा जनसमुदाय येतो, फक्त महाराष्ट्रातूच नव्हे तर संपूर्ण जगभरातून लोक विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असतात. पंढरीला जाणारी आषाढी वारीही महाराष्ट्रातील अनेक वर्षांपासून चालत आलेली महत्त्वाची परंपरा राहिली आहे. पंढरीची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सोहळा मानला जातो. याच अनुषंगाने एक महत्वाची बातमी समोर आली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी हे सुद्धा आषाढी वारीत सहभाग घेऊन विठुरायाचे दर्शन घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते शरद पवार यांच्या मागोमाग आता राहुल गांधी सुद्धा पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी हा निर्णय घेत असल्याचं बोललं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, . राज्यात येत्या तीन-चार महिन्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी हे पंढरीच्या वारीत सहभागी झाल्यास काँग्रेस पक्षासाठी ते फायदेशीर ठरु शकते. यामुळे राहुल गांधी हे पंढरीच्या आषाढी वारीत सहभागी होण्याविषयी विचार करत आहेत. राहुल गांधी यांनी यापूर्वी भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने हजारो किलोमीटरची पायपीट केली आहे. त्यामुळे पंढरीच्या वारीत चालणे त्यांच्यासाठी सहजसोपी गोष्ट ठरु शकते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात सर्वाधिक 13 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे काँग्रेस पक्षात नवचैतन्य संचारले आहे. आता विधानसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधी पंढरीच्या वारीत सहभागी झाल्यास त्यांना हजारो वारकरी आणि जनसामान्यांपर्यंत पोहोचता येईल. तसेच यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा उत्साहदेखील कैकपटीने वाढू शकतो. त्यामुळे आता राहुल गांधी खरोखरच पंढरीच्या वारीत चालणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

राहुल गांधी पंढरपुरात जाऊन विठुरायाचे दर्शन घेणार

महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव असणाऱ्या आषाढी सोहळ्यासाठी लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी हे 13 किंवा 14 जुलै रोजी पंढरपुरात येऊन विठुरायाचे दर्शन घेणार आहेत . याबाबत काँग्रेसच्या एका जेष्ठ नेत्याने यास दुजोरा दिला असून 17 जुलै रोजी आषाढी एकादशीचा महासोहळा असल्याने त्यापूर्वी 13 किंवा 14 जुलै रोजी राहुल गांधी विठ्ठल मंदिरात येऊन दर्शन घेणार आहेत . त्यापूर्वी पालखी सोहळ्यासोबत चालण्याचा आनंदही त्यांना घ्यायचा असून याबाबत देखील प्रयत्न करण्यास सुरुवात झाली आहे