कोल्हापूर (प्रतिनिधी) : माहिती अधिकार कायद्याचा दुरुपयोग टाळून समाजात या कायद्याबद्दल व्यापक जनजागृती होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जि. प. च्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांनी केले.

जागतिक माहिती अधिकार दिनानिमित्त जि.प. व शिवाजी विद्यापीठातील पत्रकारिता व जनसंपर्क विभागामार्फत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विभागप्रमुख डॉ. निशा मुडे-पवार, सहायक प्रा. डॉ. शिवाजी जाधव, सहायक प्रा. डॉ. सुमेधा साळुंखे, प्राजक्ता शहा, पत्रकारिता व जनसंवाद विभागाचे विद्यार्थी आदी उपस्थित होते.

मनीषा देसाई म्हणाल्या, माहितीचा अधिकार कायद्याचे महत्व समाजातील अधिकाधिक घटकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. याकामी पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांची भूमिका महत्वपूर्ण आहे. सध्या समाजात काही लोक या कायद्याचा दुरुपयोग करत आहेत. दरम्यान या कार्यशाळेत माहितीचा अधिकार पुस्तिकेचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले. पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना माहितीचा अधिकार अधिनियमाची माहिती व्हावी, या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन केले होते.