रत्नागिरी : महाविकास आघडी आणि महायुतीमध्ये अजूनही काही ठिकाणी लोकसभेच्या जागेवरून तिढा कायम आहे. 48 मतदार संघापैकी अजून काही ठिकाणी उमेदवार जाहीर केलेलं नाहीत. आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी काही नेत्यांनी वरिष्ठांवर दबाव टाकण्याचे काम केले अजात आहे. तर काही ठिकाणी उमेदवारी न दिल्याने पक्षांतर केलं जात आहे. तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघावरून शिंदे गट आणि भाजप नेत्यांमध्ये शाब्दिक वार सुरु आहेत. यातच रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. पण अद्याप त्यांना उमेदवारी जाहीर झालेली नाही.

दरम्यान, रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे. त्यामुळे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अशात, केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी महायुतीच्या नेत्यांवर उघड नाराजी व्यक्त करत खडेबोल सूनावले आहेत. तसेच महायुतीच्या नेतेमंडळीवर नाराजी व्यक्त केली आहे. तेच तुम्ही मला प्रचाराला बोलावलं तरी आणि नाही बोलावलं तरी मी येणारच, सेही राणे यावेळी म्हणाले.

तर नारायण राणे यांनी प्रचारादरम्यान माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी नारायण राणे यांनी महायुतीच्या नेतेमंडळीवर नाराजी व्यक्त केली. “एका व्यक्तीच्या सांगण्याने काही होत नाही. अवघडच सोप करण्याची ताकद आमच्यात आहे. महायुतीच्या पुढाऱ्यांनी अपशकून करु नये. मोदींनी तिसऱ्यांदा निवडून यावे. या देशाला जगाच्या अर्थव्यवस्थेत प्रगती करता यावी. आपला देश तिसऱ्या क्रमांकावर यावा. अमेरिका, चीन आणि त्यानंतर भारत असावा, त्यासाठी परत एकदा मोदींना संधी देण्यात यावी. मोदींची हॅटट्रीक होणार आहे. 400 जागाही येणार आहेत. 400 जागांमध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा खासदार असणारच आहे. त्यादृष्टीने प्रयत्न आहेत”, असे नारायण राणे म्हणाले.

याशिवाय, “ज्यांच्याकडे काही नाही, असे लोक मोदींवर टीका करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जगभरात कौतुक होतं आहे. मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यापासून एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. मोदींची प्रतिमा स्वच्छ आहे. अनेक महापुरुष झाले. पण मोदी महान आहेत. खासदार झालो तर अभिमान वाटेल असं काम करेन.

अर्थव्यवस्थेची जाण असलेला माणूस आपला पंतप्रधान आहे. लोकांना फक्त हे देऊ ते देऊ सांगणारे राहुल गांधी लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणार आहेत का? दोन दिवसांत पुन्हा येतो. तुम्ही मला बोलवत तरीही आणि नाही बोलवत तरी प्रचारासाठी येईल. नुसतं दाढी वाढवून यात्रा करत मोदींवर टीका करत आहेत. कोकणात विद्यापीठे नाहीत, मोठे उद्योगधंदे नाहीत. निवडणूक झाली की दोन महिन्यात सगळे प्रश्न सोडवून दाखवेन”, असेही नारायण राणे यावेळी म्हणाले.