कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : कोल्हापूर जिल्ह्यात उद्भवणाऱ्या पूरस्थिती संदर्भात तसेच पंचगंगा नदी आणि इतर नद्यांमधील गाळ काढण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली, असा प्रश्न विधान परिषदेतील काँग्रेसचे गट नेते आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, नद्यांमधील गाळ निष्कासन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली असल्याची माहिती दिली.

कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नद्या असून, जिल्ह्यातील पूरस्थितीला जबाबदार असलेल्या नद्यांमधील गाळ मागील दहा ते बारा वर्षांपासून काढलेला नाही. त्यामुळे पंचगंगा नदीत आणि इतर नद्यांमध्ये सुमारे साडेपाच लाख घनमीटर गाळ साचल्याने तिथे पावसाळ्यात पुराचा धोका निर्माण झाला आहे. याबाबतचा प्रश्न विधान परिषदेचे गटनेतेआमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. जिल्ह्यातील पूर परिस्थिती संदर्भात तसेच पंचगंगा नदी आणि इतर नद्यांमधील गाळ करण्यासाठी शासनाने कोणती उपाययोजना केली आहे, असा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला. यावर उत्तर देताना नद्यांमधील गाळ निष्कासन करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. जलसंपदा विभागाच्या शासन निर्णयानुसार गाळ काढण्याकरिता आवश्यक बाबींची पूर्तता करून अंदाजपत्रक तयार करण्याची कार्यवाही क्षेत्रीय स्तरावर प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले.

दूधगंगा धरणाची गळती कायमस्वरूपी थांबवण्याकरता कोणती उपाययोजना केली असा प्रश्नही आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला. यावर उत्तर देताना, गळती प्रतिबंधक उपाय योजनेच्या कामाची 62.48 कोटी किंमतीची निविदा कार्यवाही ही जलसंपदा विभागाच्या शासन निर्णयानुसार करण्यात येत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.