सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : प्रत्येक विद्यार्थी ही राष्ट्राची संपत्ती आहे. जिल्ह्यातील वाढत्या पटाच्या शाळा तसेच कमी पटाच्या शाळांचा अभ्यास करुन गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्याचा या जिल्ह्यात चांगला प्रयत्न करू. अशी प्रतिक्रिया सिंधुदुर्गचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर यांनी दिली. ते आज (बुधवार) प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारताना बोलत होते.

कळमळकर म्हणाले की, आपण प्राथमिक शिक्षक होतो. एमपीएससी परीक्षापासून आपण या पदापर्यंत पोहोचलो. या जिल्ह्यातही वाढत्या पटसंख्येच्या शाळा आणि कमी पटसंख्या झालेल्या शाळा शोधून पटसंख्या वाढविण्याबरोबरच गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आपला प्रयत्न राहील. विविध शिक्षक संघटना, प्रशासन यांच्याशी चर्चा करून चांगले निर्णय घेऊन या जिल्ह्यात आदर्श शाळा कशा निर्माण होतील याचाही प्रयत्न करू असे ते म्हणाले.

गुणवत्ता तसेच शासनाचे शैक्षणिक धोरण प्राथमिक शाळांमधील कमी होणारी विद्यार्थी पटसंख्या या सर्वांचा विचार करून सध्या या जिल्ह्यात वाढलेल्या पटसंख्येच्या शाळांचाही अभ्यास केला जाईल. कमी शाळांमधील पटसंख्या वाढविण्याचा प्रयत्न करतानाच सर्व शाळांमध्ये दर्जेदार शिक्षणासाठी पावले उचलली जातील, असेही कमळकर म्हणाले.