मुंबई : राज्यातील महायुतीच्या सरकारला रविवार, 30 जून रोजी दोन वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सहकाऱ्यांचे तसेच जनतेचे आभार मानले आहेत. असंगाचा संग सोडत सरकार स्थापन केल्याने जनतेचे सरकार स्थापन करता आल्याचे देखील ते म्हणाले. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी जून 2022 मध्ये विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीची मतमोजणी सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील 16 आमदारांसह गुजरातचं सुरत शहर गाठलं आणि शिवसेना विधिमंडळ पक्षात उभी फूट पडली. त्यानंतर पक्षातील आणखी 24 आमदार त्यांना जाऊन मिळाले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जात सरकार स्थापन केलं. या घटनेला आता दोन वर्षे पूर्ण झाली आहेत.

दरम्यान, शिवसेनेतील फुटीला आणि राज्यातील नव्या सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे, विचार.. विकास.. आणि विश्वास… राज्यात सत्तेवर आलेल्या सामान्यांच्या सरकारला आज दोन वर्षे होत आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार, राज्याच्या विकासाचा ध्यास आणि सामान्यांचा विश्वास यांच्या बळावर महायुती सरकारने दोन वर्षांची यशस्वी वाटचाल केली आहे.

जनतेचा विश्वास कमावल्याचे समाधान
आपल्या या पोस्टमध्ये मुख्यमंत्री म्हणतात, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्याशी वैचारिक दगाबाजी करीत, ज्यांनी असंगाशी संग केला होता, त्यांची साथ सोडून आम्ही जनतेच्या मनातले सरकार स्थापन केले, त्याला आज दोन वर्षे पूर्ण होत आहेत. शिवसेनाप्रमुखांचा विचार जपण्यासाठी स्थापन झालेल्या या सरकारने देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कणखर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली दोन वर्षे महाराष्ट्राच्या विकासाचा ध्यास घेऊन अहोरात्र काम केले. त्यातूनच जनतेचा विश्वास आम्ही कमावला, याचे आज समाधान आणि आनंद आहे. शेतकरी, कष्टकरी, महिला, युवकांसह समाजातील प्रत्येक घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे. यामुळेच गेल्या दोन वर्षांत जनतेसाठी अनेक कल्याणकारी निर्णय घेणे आम्हाला शक्य झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तसेच, शिंदे यांनी म्हटलं आहे की या दोन वर्षांच्या काळात देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं भक्कम पाठबळ लाभलं. उपमुख्यमंत्री देवेंद्रज फडणवीस, अजित पवार आणि सर्व सहकाऱ्यांची समर्थ साथ लाभली. राज्यातील जनतेनं दिलेलं प्रेम, शिवसैनिकांची साथ आणि महायुतीमधील पक्षांचा उत्तम समन्वय यामुळे लोकहिताची शेकडो कामे मार्गी लागली. राज्यातील शेतकरी, कष्टकरी, महिला, ज्येष्ठ आणि युवकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू उमटवता आले. आम्ही घेतलेल्या निर्णयावर राज्यातील जनतेनेही विश्वासाची मोहर उमटवत साथ दिली, याचा अभिमान आहे आणि त्यातून निर्माण झालेल्या जबाबदारीचे भानही आहे.

एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या संस्कारामुळेच हे सगळं घडू शकलं. आम्हाला हेच विचार आणि संस्कार घेऊन पुढील वाटचाल करायची आहे. विकास साधायचा आहे आणि विश्वास वृद्धिंगत करायचा आहे. गेल्या दोन वर्षांत पाठीशी ठाम उभे राहिलेल्या प्रत्येक व्यक्तीचे ऋण व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही. प्रत्येक घटकाचे अंतःकरणापासून आभार. जय हिंद. जय महाराष्ट्र.