नवी दिल्ली : उत्तरप्रदेशातील जलसंपदा राज्यमंत्री दिनेश खटीक यांनी राजीनामा दिल्याने योगी सरकारच्या मंत्रिमंडळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, तीन मंत्री राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा काही दिवसांपासून सोशल मीडियावरुन सुरु आहे. खटीक यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. ते काही महिन्यापासून नाराज होते.

‘मी दलित असल्याने मला अधिकाऱ्यांकडून योग्य वागणूक मिळत नाही’ असा आरोप करून  दिनेश खटीक म्हणतात, आपल्याला बैठकांचे निमंत्रण दिले जात नव्हते. आपल्यासोबत कोणत्याही बैठका घेतल्या जात नाहीत. फक्त गाडी देण्यात आली. अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. राजीनाम्याची प्रत त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व राज्यपालांना पाठवली आहे. भाजपकडून खटीक यांच्या राजीनाम्याबाबत अद्यापही कोणत्याही प्रकारचा खुलासा करण्यात आलेला नाही.