कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या जवळ दक्षिण बाजूस जिल्हा निवडणूक शाखा यांच्यावतीने आज (बुधवार) मतदार नोंदणी मदत कक्ष सुरू करण्यात आले.

शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक यांनी दि. २६ नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणी कक्षास भेट देऊन नवीन मतदार नोंदणी करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

नोंदणी कक्षाद्वारे नवतरूण मतदार यांची मतदार नोंदणी, मतदार यादीतील तपशील दुरूस्त करणे याकरिता नमुना क्र. ६ व नमुना क्र.८ चे अर्ज भरून घेणे व चौकशीद्वारे मतदार यादीच्या नोंदणी प्रक्रियेची माहिती देणे इ. सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे. मतदार नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन अथवा ऑफलाईन पध्दतीने होणार आहे.

व्होटर हेल्पलाईन ॲपद्वारे माहितीचे संकलन करणे व भरण्याची कामे सुरू आहे. विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारणे व शंकांचे निरसन करण्याचे काम जिल्हा निवडणूक शाखेतील अधिकारी व कर्मचारी करीत आहेत. आज दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांनी विद्यापीठातील मतदार नोंदणी कक्षास भेट दिली.