माणगाव – निजामपूर : महायुतीतील तिन्ही पक्षांच्या जीवनातील राजकीय परीक्षेची ही कसोटी आहे. त्या कसोटीला आपण निश्चितपणे उतरु असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे यांनी निजामपूर येथील महायुतीच्या जाहीर सभेत व्यक्त केला.

राजकारणात फेरबदल होत असतात. समीकरणे बदलत असतात. आपण राजकीय विरोधक यावेळी एकत्र आलो आहोत, हे नवीन राजकारण देशाच्या हिताचे आहे. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा निवडणूक लढली जातेय तर अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्यांदा निवडणूक लढतोय, देवेंद्रजी भाजपच्या नेतृत्वाखाली अनेक निवडणूका लढवत आले आहेत, असेही सुनिल तटकरे यावेळी म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत ९० टक्क्याच्या पुढे परीक्षेत पास होणार आहोत आणि विधानसभेच्या परीक्षेत दोन टक्के जास्त पास आपण होणार आहोत. मनामध्ये कुणाच्या संभ्रम असता कामा नये. एकच उद्दीष्ट तुमचं – माझं समान आहे की, या भागातील विकासाच्या कामाला ताकदीने तुम्ही – आम्ही केंद्र व राज्य सरकारच्या योजना एकत्रितपणे राबवायच्या हे धोरण घेऊन आपण पुढच्या कालावधीत काम करत राहूया असे आवाहन सुनिल तटकरे यांनी केले.

एनडीएमध्ये आणि राज्यात महायुतीमध्ये आम्ही सहभागी होण्याचा निर्णय घेतला. सत्ता उपभोगण्यासाठी नाही तर सत्ता लोकांच्या हितासाठी, दुर्गम भागातील लोकांना न्याय देण्यासाठी, त्यांचा वापर करण्यासाठी नाही असेही सुनिल तटकरे यांनी विरोधकांच्या टिकेला उत्तर देताना ठणकावून सांगितले.

या लोकसभा निवडणुकीत जेवढे मताधिक्य मिळेल त्यापेक्षा जास्त मताधिक्य भरतशेठ गोगावले यांना विधानसभेत देण्याचा प्रयत्न करु असे आश्वासन सुनिल तटकरे यांनी जाहीर सभेत दिले.

निजामपूर येथे झालेली ही प्रचंड सभा झाल्यानंतर अनंत गीते इथे सभा घेण्याचे धाडस करतील याबद्दल शंका असून जरी त्यांनी सभा घेतली तरी ती कुठल्यातरी गल्लीत घेतील. त्यांना ती घेऊ द्या परंतु त्यांना ३० वर्ष संसदेत काम करण्यासाठी पाठवले होते. ते दहा वर्ष केंद्रीय मंत्री होते पण त्यांनी केलेले एखादं काम त्यांना दाखवता येत नाही ही त्यांची शोकांतिका आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले.

आठ वर्षे भाजपच्या मदतीने अनंत गीते लोकसभेत गेले. परंतु आज टिका करत आहेत. राजकारणात एक सभ्यता असली पाहिजे. एक वैचारिक अधिष्ठान असले पाहिजे. निवडणूक आपण लढवत असतो त्यावेळी इतकी वर्षे लोकांनी आपल्याला संसदेत काम करण्यासाठी पाठवले याचे भान असले पाहिजे. भरतशेठ गोगावले नसते तर २०१४ सालीच मोठ्या मताधिक्याने याच सुनिल तटकरेंनी पराभूत केले असते. यांच्यामुळे ते तरले नाहीतर २०१९ मध्ये माझं मताधिक्य लाखाच्या पुढे गेले असते असे सांगतानाच ज्यांच्यासाठी तन मन धन म्हणून काम केलात तसे आता माझ्यासाठी एकदा करा अशी विनंती सुनिल तटकरे यांनी भरतशेठ गोगावले यांना यावेळी केली.

चुकीचा इतिहास जर कुणी सांगत असेल तर मलाही सत्य सांगावे लागेल आणि मी हे सत्य सांगितल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही सुनिल तटकरे यांनी टिकाकारांना दिला. राज ठाकरे यांनी लोकसभेला एकही उमेदवार उभा न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करण्यासाठी बिनशर्त पाठिंबा दिला त्याबद्दल राज ठाकरे यांचे सुनिल तटकरे यांनी आभार मानले.

या सगळ्या परीसरातील लोकांची पाण्याची तहान भागवली जाईलच पण नवीन नवीन जे रोजगार या परीसरात निर्माण होत आहेत शिवाय जो पर्यटक पुण्याकडे निघालेला आहे तो या ताम्हाणी घाटातून खाली येतोय त्याला विसाव्याचे चांगले ठिकाण निजामपूर आणि परीसरात निर्माण करण्याची बांधिलकी घेऊन आपण सर्वजण मिळून कामाला लागुया असे आवाहनही सुनिल तटकरे यांनी केले.
आपल्या एका हाकेवर रणरणत्या उन्हात इतक्या मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय येतो इतकं प्रेम आपण लोकांकडून कमवलं आहे त्या प्रेमाचे उतराई होण्याचे काम सामुदायिकरित्या विकासकामांच्या रुपाने करुया असा शब्द सुनिल तटकरे यांनी दिला.

आमदार भरत गोगावले यांनी मतदारसंघात केलेल्या कामाची पूर्ण माहिती यावेळी देतानाच सुनिल तटकरे यांना सर्वाधिक मताधिक्य देण्याचे आवाहन केले. माणगाव (निजामपूर) येथे महायुतीची आज जाहीर सभा पार पडली.