मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकांचा जोरदार प्रचार सुरू झाला आहे. प्रत्येक उमेदवार आणि प्रत्येक पक्ष जोमाने प्रचार करताना पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते, सरकारमधील उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रविवारी (ता. 21 एप्रिल) यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांच्या प्रचारसभेला हजेरी लावली होती. राजश्री हेमंत यांच्या प्रचारार्थ राळेगाव येथे ही सभा आयोजित करण्यात आली होती. परंतु, उदय सामंत हे सभास्थळी असताना प्रचारसभेवेळी एका अज्ञाताकडून गाडी फोडण्यात आली. या घटनेमुळे काही काळासाठी प्रचारसभेच्या ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी महायुतीकडून शिंदे गटाच्या उमेदवार असलेल्या राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ राळेगाव येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री उदय सामंत ही उपस्थित होते. परंतु, उदय सामंत हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंचावर येण्यापूर्वी सभास्थळी पोहोचले. त्यानंतर ते मंचावर बसल्यानंतर सभा मंडपाबाहेर उभ्या असलेल्या त्यांच्या वाहनातील एका ताफ्यावर अज्ञाताकडून दगड भिरकावण्यात आला. हा दगड ताफ्यातील एका गाडीवर बसल्यानंतर त्या वाहनाची काट फुटली.

या घटनेबाबत मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, वाशिम-यवतमाळ लोकसभेच्या प्रचारासाठी राळेगावमध्ये असताना, ज्या वाहनात बसणार होतो, त्या कारवर दगड मारण्याचा प्रयत्न झाला. यामुळे कारची काच फुटली. ही बातमी प्रसारमाध्यमांमध्ये पाहिली आणि खात्री करून घेतली. तेव्हा हा प्रकार घडल्याचे निदर्शनास आले. मात्र, या प्रकारात कुणालाही दुखापत झालेली नाही. मी या कारमध्ये नसल्याने सुखरूप आहे, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.