कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या आयटीआय कोव्हिड केअर सेंटर मधून १३ मे रोजी रात्री १२ च्या सुमारास लोखंडी गज काढून पलायन केलेल्या खून आणि दरोडा अशा गंभीर गुन्ह्यातील न्यायालयीन दोन केद्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. प्रतिक सरनाईक (वय ३० रा. आर. के. नगर, साई कॉलनी) आणि गुंडाजी नंदीवाले (वय २८, रा. तमदलगे ता. शिरोळ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

ही कारवाई आज (मंगळवार) हातकणंगले इचलकरंजी रोडवरील शिवराज परमीट रूमच्या मागील शेतामध्ये सापळा लावून करण्यात आली. अवघ्या ११ दिवसात या आरोपींना जेरबंद केल्यामुळे या विशेष कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे आणि अप्पर पोलीस अधिक्षक तिरुपती काकडे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाचे अभिनंदन करून त्यांना २० हजार रुपये बक्षीस जाहीर केले आहे.

ही स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, सपोनि. सत्यराज घुले, उपनिरीक्षक विनायक सपाटे, पो.अ. सुरेश पाटील, असिफ कलायगार, विनोद कांबळे, राम कोळी, अमोल कोळेकर, अजित वाडेकर, उत्तम सडोलीकर यांच्यासह पथकातील पोलिसांनी केली.