कपिलेश्वर (प्रतिनिधी) : सोळांकूर येथील यशवंतराव पाटील विद्यालयात शिपाई पदावर काम करणारे दशरथ कर्णे यांच्या जुळ्या बहिणींनी दहावी बारावी परीक्षेत उज्वल यश प्राप्त केले. त्यानंतर पदवी प्राप्त करून केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेच्या अभ्यासाची जोरदार तयारी सुरू केली. एकीने दुसऱ्या प्रयत्नात तर दुसरीने सहाव्या प्रयत्नात यश मिळवले. सांख्यिकी अधिकारी या एकाच पदाला जुळ्या बहिणींनी गवसणी घालून करामत केली आहे. जिद्दीच्या जोरावर त्यांनी मिळवलेल्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मुळचे डिस्कळ ता.खटाव जि.सातारा येथील कर्णे कुटुंब नोकरीच्या निमित्ताने सोळांकूरात आले. रुपाली आणि दिपाली या दोन जुळ्या बहिणींनी मोठ्या कष्टाने पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. लोकसेवा आयोगाच्या भारतीय सांख्यिकी अधिकारी पदासाठी दिलेल्या परीक्षेतून रुपाली हिने २०२१ मध्ये यश मिळवले.तर यावर्षी नुकत्याच जाहीर झालेल्या २०२५ युपीएससी परीक्षेत दिपाली हिने त्याच पदाच्या परीक्षेत यश खेचून आणले. एकाच पोस्टला गवसणी घालत आपल्या हुशारीची चमक दाखवली आहे.

रुपाली ही सन-२०२१ साली ओबीसी गटातुन देशात पाचवी तर राज्यात पहिला क्रमांकाने उत्तीर्ण झाली तर रुपाली ही यावर्षी झालेला खुल्या गटातून देशात चोवीसावी तर राज्यात पहिला क्रमांकाने उत्तीर्ण झाली. कोणतीही मोठी शैक्षणिक अथवा प्रशासकीय सेवेची पार्श्वभूमी नसताना या मुलींनी खेचून आणलेले केंद्रीय लोकसेवा आयोग परिक्षेतील यश हे सर्वसामान्य कुटुंबातील व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांचासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.