कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीकडील ५८ प्राथमिक शाळांतील १८६ शिक्षकांची बदलीची प्रक्रिया मंगळवारी राबविण्यात आली. महापालिकेच्या वि. स. खांडेकर विद्यालयात ही बदली प्रक्रिया पार पडली. शिक्षकांच्या या बदल्या करताना सर्व निकषांचे पालन करुन पारदर्शकपणे करण्यात आल्या.

प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त शिल्पा दरेकर, सहायफ आयुक्त विनायक औंधकर, प्रशासनाधिकारी डी. सी. कुंभार यांच्या नियंत्रणात या बदल्या करण्यात आल्या. सर्वसाधारणपणे एका शाळेत ७ वर्षाची सेवा पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांची बदली करण्याचा महापालिकेचा निकष आहे. कोरोना कालावधीत बदली प्रक्रिया पूर्णपणे थांबवली गेल्याने बदलीपात्र शिक्षकांची संख्या यावेळी वाढली आहे.

प्राथमिक शिक्षण समितीकडून बदली बाबतची सविस्तर माहिती संगणकीकृत करण्यात आली. बदली प्रक्रियेत १३ मुख्याध्यापकसह पदवीधर शिक्षक व सहाय्यक शिक्षक मिळून एकूण १८६ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. बदली करताना प्रत्येक शिक्षकाला स्क्रीनवर रिक्त पदांच्या शाळेची यादी दाखविण्यात आली व शाळा निवड करण्याची संधी देण्यात आली. प्राथमिक शिक्षण समितीच्या रसूल पाटील, पर्यवेक्षक विजय माळी, उषा सरदेसाई, बाळासाहेब कांबळे, अविनाश लाड यांनी हे कामकाज पाहिले.