मुंबई (प्रतिनिधी) : राज्याबाहेर दिल्ली आणि इतर ठिकाणी कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दिल्ली, गोवा,राजस्थान आणि गुजरात मधील प्रवाशांना महाराष्ट्रात येण्यास निर्बंध लावले आहेत. कोरोना चाचणी करूनच राज्यात प्रवेश देण्यात येईल, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत चालली होती. मात्र दिवाळीच्या खरेदी आणि प्रवासादरम्यान कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होण्याची शक्यता वाढली आहे. यातच दिल्लीमध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्याने महाराष्ट्रातही कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अनलॉकच्या प्रक्रियेत शिथिल केलेले निर्बंध पुन्हा एकदा लागू करण्यात येतील, असे सांगितले आहे. त्यामुळेच “दिल्ली, राजस्थान, गोवा आणि गुजरातमधून येणाऱ्या हवाई प्रवाशांना महाराष्ट्रातील विमानतळावर उतरल्यानंतर RT-PCR रिपोर्ट सादर करणे बंधनकारक आहे. नियोजित प्रवासाच्या ७२ तास आधी ही चाचणी करावी लागेल” असे महाराष्ट्र सरकारने लागू केलेल्या SOP मध्ये म्हटले आहे.