कुरुंदवाड (कुलदीप कुंभार) : कुरुंदवाड नगरपालिकेच्या बहुप्रतिक्षित नगराध्यक्ष पदाचे आरक्षण ‘सर्वसाधारण महिला’ गटासाठी निश्चित होताच, येथील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. तिकीट मिळवण्यासाठी इच्छुकांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु झाली असून, कुरुंदवाडमधील आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी एका बड्या नेत्याने पडद्याआड ‘खेळी’ करण्यास सुरुवात केल्याची चर्चा आहे.या नेत्याच्या सक्रियतेमुळे कुरुंदवाडच्या राजकारणात मोठे भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शहरातील गल्लीबोळात सध्या याच चर्चेने जोर धरला असून, निवडणुकीपूर्वीच एका मोठ्या राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षात मोठा ‘सुरुंग’ लागण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जात आहे. नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी जिल्ह्याच्या राजकारणातूनही हालचालींना वेग आला आहे. कोल्हापूर शहरात एका नेत्याच्या निवासस्थानी इच्छुक आणि पक्षश्रेष्ठींच्या गुप्त बैठका पार पडत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकांमध्ये उमेदवारी कोणाला द्यायची? तसेच, संभाव्य बंडखोरी कशी हाताळायची, यावर विचारमंथन सुरू असल्याचे समजते.
आगामी काळात कोणत्या पक्षाकडून कोणाला तिकीट मिळणार? किंवा निवडणुकीच्या तोंडावर कोण महत्त्वाचे नेते अपक्ष उमेदवारी जाहीर करून विद्यमान राजकीय समीकरणांना आव्हान देणार, याकडे केवळ कुरुंदवाडचेच नव्हे, तर संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.