कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांनी केलेली कामं मी केली असं म्हणण्यात अर्थ नाही. तसं असेल तर मग माझ्या वडिलांनी केलेली कामं, मी केली असं म्हणायचं का? असा सवाल  कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी विरोधकांना केला आहे.आज कोल्हापुरातील कोटी तीर्थ स्वामी समर्थ मंदिरातून अधिकृतपणे महायुतीच्या प्रचाराला सुरुवात करण्यात आली.यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गादीबद्दल आदरच आहे.पण निवडणुकीच्या रिंगणात टीका टिप्पणी होणं स्वाभाविक आहे.विरोधकांना लोकशाही हवी आहे की, नाही कळत नाही. उमेदवारांने काय केले म्हणून मला ट्रोलिंग केले जाते. पण मी त्याला उत्तर देत आहे. तसेच, राजर्षी शाहू महाराजांनी केलेली कामं मी केली असं म्हणण्यात अर्थ नाही. तसं असेल तर मग माझ्या वडिलांनी केलेली कामं, मी केली असं म्हणायचं का?

यावेळी निवडणुकीत आपल्या विजयाचा विश्वास संजय मंडलिक यांनी व्यक्त केला आहे. तसेच, आमचा प्रचार आधीपासूनच सुरू झाला आहे. शिवसेनेच्या प्रथेनुसार कोटी तीर्थ स्वामी समर्थ मंदिरातून अधिकृतपणे प्रचाराला सुरुवात करत असून  2009 ची पुनरावृत्ती होऊन या निवडणुकीत मी अधिक लीडने निवडून येईन असंही  संजय मंडलिक म्हणाले.

यावेळी संजय मंडलिक यांनी सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, मला कळत नाही उमेदवार सतेज पाटील आहेत की आणखी कोण आहेत. सतेज पाटील उमेदवार असते तर मी त्यांच्यावर बोललो असतो. आता महाराजांवर बोलतोय तर म्हणतायेत गादीचा अपमान होतोय, तर आम्ही काय करायचे आता राजेशाही शिल्लक राहिलेली नाही. सतेज पाटील यांना महाराजांनी प्रवक्ता म्हणून नेमला आहे का? मला माहित नाही. तसे असेल तर त्यांना उत्तर माझे प्रवक्ते देतील.  असे संजय मंडलिक यांनी सांगितले.