अॅडलेड (वृत्तसंस्था) : भारताचा उपांत्य फेरीचा सामना अॅडलेडच्या मैदानावर इंग्लंडसोबत होणार आहे. भारत सध्या सर्वाधिक गुणांसह मजबूत स्थितीत आहे, पण भारताचे तीन गोष्टींमुळे दडपण वाढले आहे. रोहित शर्माला झालेली दुखापत, भारताची आतापर्यंत डळमळीत सुरुवात आणि फिरकी गोलंदाजांचे अपयश या तीन कारणांमुळे भारतीय संघाचे टेन्शन वाढले आहे.

विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि केएल राहुल यांच्यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताची फलंदाजी जोरदार होत आहे; मात्र या संपूर्ण स्पर्धेत भारताची सलामी आतापर्यंत चांगली झालेली नाही. रोहित शर्मा आणि केएल राहुल यांच्यात दमदार भागीदारी झालेली नाही. गोलंदाजीही चिंतेचे कारण आहे. १९८७  मधील ५० षटकांच्या विश्वचषकानंतर भारत पहिल्यांदाच कोणत्याही आयसीसी स्पर्धेच्या बाद फेरीत इंग्लंडचा सामना करणार आहे. विशेष म्हणजे १९८७ मध्ये देखील इंग्लंडने ३५ धावांनी विजय मिळवला होता.

भारताची सर्वात मोठी समस्या कर्णधार रोहित शर्माची फलंदाजी आहे. रोहित शर्माने आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये केवळ ८९ धावा केल्या आहेत. नेदरलँड्सविरुद्ध अर्धशतक ठोकण्याशिवाय त्याला एकाही सामन्यात चांगली कामगिरी करता आली नाही. त्यात सराव सत्रात दुखापतीमुळे तो काही काळ त्रस्त झाला आहे. दुसरीकडे रोहितचा फॉर्म एक चिंतेचा विषय आहे.

पॉवर प्लेचा फायदा भारताला अजून घेता आलेला नाही. सलामीची जोडी लवकर बाद झाल्याने दबाव वाढतो आणि नवीन फलंदाजांना अधिक सावधपणे खेळण्यासाठी पॉवर प्लेमध्ये संथ खेळावे लागते. सुरुवातीच्या पॉवरप्लेमध्ये चांगली सुरुवात न केल्याने दुसऱ्या पॉवरप्लेमध्ये ‘करा किंवा मरो’ अशी परिस्थिती निर्माण होते. अशा स्थितीत सूर्यकुमार यादवसारखा फलंदाज खेळला नाही तर धावसंख्या कमी राहू शकते.

भारताची वेगवान गोलंदाजी सध्या चांगली आहे. अर्शदीप सुरुवातीच्या षटकांमध्ये विकेट घेत आहे. त्याला भुवनेश्वर आणि मोहम्मद शमीची चांगली साथ मिळत आहे; पण भारतासाठी सर्वात मोठे टेन्शन आहे ते फिरकी गोलंदाजीचे. आर अश्विन नक्कीच विकेट घेत आहे; पण त्याला एकाच षटकात बऱ्याच धावाही पडत आहेत. अक्षर पटेलबाबतीतही तसेच होत आहे. त्यात चहलला अजून संधीच मिळालेली नाही. याशिवाय भारताच्या क्षेत्ररक्षणामध्ये जाडेजा नसल्याने बरीच कमतरता दिसून येत आहे.