मुंबई (प्रतिनिधी) : मागील आठवड्यातील तीन दिवस बाजारात मोठी घसरण दिसून आली होती. नाताळाच्या सुट्टीनंतर सुरू झालेल्या बाजारात आज गुंतवणूकदारांचा सेलिब्रेशन मूड दिसला.

गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीमुळे बाजारात तेजी दिसून आली. सेन्सेक्स निर्देशांकाने ६० हजार अंकांचा टप्पा ओलांडला. तर, निफ्टीने १८ हजार अंकांचा टप्पा ओलांडण्यास यश मिळवले. आज शेअर बाजारातील व्यवहार तेजीसह बंद झाले. 

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये ७०४ अंकांची तेजी दिसून आली. सेन्सेक्स ६०,५५५ अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी २०० अंकांच्या तेजीसह १८००६ अंकांवर स्थिरावला.  फार्मा आणि हेल्थकेअर समभाग वगळता इतर सर्व क्षेत्रातील समभाग वधारत बंद झाले. बँकिंग सेक्टरमध्ये खरेदीचा उत्साह दिसून आला. बँक निफ्टी २.३१ टक्क्यांनी वधारत बंद झाला. तसेच बँक निफ्टीतील तेजीने शेअर बाजाराचे निर्देशांक वधारले.