मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे काही काल बंद ठेवावी लागलेली सेवा, रोडावलेली प्रवासी संख्या, डिझेलचे वाढलेले भाव यामुळे कोट्यवधींचे नुकसान सोसावे लागल्याने आधीच अडचणीत असलेल्या एसटी महामंडळाचा पाय आणखीनच खोलात गेला आहे. यामुळे प्रवासी भाड्यात वाढ करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला असल्याचे वृत्त आहे. यामुळे प्रवाशांना जादा भुर्दंड सोसावा लागणार आहे.  

सध्या एसटी महामंडळाच्या १५ ते १६ हजार बस डिझेलवर धावत आहेत. त्यातील सध्या १० हजार गाड्या प्रवासी वाहतूकीसाठी धावत आहेत. त्यासाठी दररोज ८ लाख लिटर डिझेल लागत आहे. एसटीचा ३८ टक्के महसूल हा इंधनासाठी खर्च होत आहे. एसटीचे दररोज २१ कोटी रुपयांचे उत्पन्न करोनाच्या काळात लाखांवर आले होते. जुलैमध्ये हे उत्पन्न ८ कोटीपर्यंत गेले होते. मात्र, पुरेसे उत्पन्न नसल्यानं एसटी कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यासाठी राज्य सरकारची मदत घ्यावी लागत आहे. त्यामुळेच महामंडळाने भाडेदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या वाढीमुळे एसटीच्या महसुलात काही प्रमाणात वाढ होईल, असे मानले जात असले, तरी महामंडळाच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य प्रवाशांना जादा भाडे मोजून एसटीचा प्रवास करणे भाग पडणार आहे.