नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘आरआरआर’ सिनेमातील ‘नाटू-नाटू’ गाण्याने चाहत्यांचे प्रचंड मनोरंजन केले आहे. आता तर ‘नाटू-नाटू’ गाण्याने विश्व विक्रम रचला आहे. लॉस एंजिलिसमध्ये ८० वा गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात एस. एस. राजामौली यांच्या ‘आरआरआर’ या चित्रपटाचा डंका पाहायला मिळाला.

‘आरआरआर’ मधील नाटू नाटू या गाण्याने सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा पुरस्कार जिंकला आहे. अभिमानास्पद गोष्ट म्हणजे भारतातील पहिल्या सिनेमाने हॉलिवूडमधील अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कारावर नाव नोंदवले आहे.

गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात दिग्दर्शक एस. एस. राजामौली, ज्युनिअर एनटीआर, रामचरण आणि त्याची पत्नी उपासना यांनी हजेरी लावली. सध्या सर्वत्र ‘नाटू-नाटू’ आणि ‘आरआरआर’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर प्रत्येक जण सिनेमाच्या टीमचे कौतुक करत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सिनेमाच्या टीमची कौतुकाने पाठ थोपटली आहे. ट्विट करत मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विट करत मोदी म्हणाले, ‘सर्वात खास सिद्धता’ या प्रतिष्ठित सन्मानाने प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला आहे.’ असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिनेमाच्या टीमचे कौतुक केले आहे. शिवाय कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शकांना टॅग देखील केले आहे. अभिनेता शाहरुख खानने देखील या सिनेमाचे कौतुक केले आहे.

आज जगप्रसिद्द्ध झालेले गाणं कालभैरव आणि राहुल सिपलीगुंज यांनी गायले. गाणेे शूट करायला बराच वेळ लागला. युक्रेनच्या प्रेसिडेंशियल पॅलेसच्या बॅकग्राउंडमध्ये ‘नाटू-नाटू’ गाण्याचे शूटिंग करण्यात आले. ‘आरआरआर’ मधील ‘नाटू नाटू’ या गाण्याने सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा पुरस्कार जिंकला आहे.