मुरगूड ( प्रतिनिधी ) : नणदी येथील ग्रामदैवत हालसिद्धनाथ देवस्थान यात्रेनिमित्त बुधवारी पहाटे भाकणूक कथन कार्यक्रम पार पडला. या भाकणूकमध्ये कृष्णात डोणे महाराज-वाघापूर यांनी अनेक मोठमोठ्या संकटे येणार असल्याचे संकेत दिले आहेत.
मेघाची कावड गैरहंगामी हाय. हुकमी पाऊस दगा देईल. तापमानाचा पारा गगनाला जाईल. पाणीटंचाई भासेल. दीड महिन्याचे पीक येईल. बैलाची किंमत बकऱ्याला येईल. बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल. बकऱ्याचा भाव लाखात जाईल. जगात मोठं नवल होईल. मेंढीच्या पोटी मुलगा जन्माला येईल. भगवा झेंडा राज्य करेल, अशी भाकणूक कृष्णात डोणे महाराज-वाघापूर यांनी कथन केली.
तर राजकारणासंबंधीची मोठे उलताफलक होण्याची संकेत या भाकणूकित देण्यात आले. राजकारणात मोठा गोंधळ होईल. राजकीय नेते या पक्षातून त्या पक्षात कोलांटउड्या मारतील. भांडून खेळतील. राजकीय नेते सत्ता आणि संपत्तीच्या मागे लागतील. लाचलुचपत आणि भ्रष्टाचाराला ऊत येईल. राजकीय नेते मोठमोठ्या घोटाळ्यात अडकून बसतील. अतिरेकी लोक येतील. बॉम्बस्फोट होतील. युद्धाचा भडका उडेल. जगाचा चौथाई कोना ओस पडेल. जगातील अनेक देश युद्धात उतरतील.
युद्धाच्या स्पर्धा लागतील. दिवसाढवळ्या दरोडे पडतील. 12 वर्षाची मुलगी आई होईल. बारा वर्षाचे बालपण, 24 वर्षाचे तरुणपण आणि ३५ वर्षाच म्हातारपण येईल. देशात मोठमोठे कायदे येतील. समान नागरी कायदा येईल. नदीजोड प्रकल्प होतील, कोणाच्या तरी पोटी शिवाजी महाराज जन्माला येतील. भगवा झेंडा राज करेल. तुम्ही माझी सेवा करा. नणदी, नणदीवाडी पांढरीचे रक्षण करेल, अशी भाकणूक कृष्णात ढोणे महाराज यांनी कथन केली. मानकऱ्यांना भंडारा देऊन भाकणुकीची सांगता झाली.