कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील कोरोनाग्रस्तांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. मागील २ महिन्यांचे वेतन आणि सोईसुविधा न मिळाल्याने आजरा कोविड सेंटर वरील कंत्राटी डॉक्टर आणि नर्स यांनी कामबंद आंदोलन सुरु केले आहे. यामुळे आजरा तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या आरोग्याचं काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे आरोग्य राज्यमंत्रीपदाचा कारभार आहे. असे असतांनाही जिल्ह्यात असा प्रकार घडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कोरोनाबाधित रुग्णांची हेळसांड होत आहे. सर्व कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. बर्यापैकी डॉक्टर आणि नर्सही पॉझिटिव्ह आल्या आहेत. मात्र या स्टाफला हलक्या दर्जाचे मास्क, हॅन्डग्लोज मिळतात, असा आरोप येथिल कर्मचारी यांनी केला आहे. जोपर्यंत हे प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.