गांधीनगर (प्रतिनिधी) : घरभाडे देण्याच्या क्षुल्लक कारणावरून दोघा परप्रांतीय मजुरांनी आपल्याच सहकारी मजुराचा डोक्यात दगड घालून खून केल्याचा प्रकार सोमवारी रात्री गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील शांतीप्रकाश झोपडपट्टीत घडला आहे. राजू पातलिया मुजालदा (वय ३०, मूळ रा. सेमलखुट पो. हेलापडवा ता. झिरन्या, जि. खरगोन, मध्यप्रदेश) असे त्याचे नाव आहे. हा प्रकार आज (मंगळवार) सकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीस आला. गांधीनगर पोलिसांनी याप्रकरणी दिनेश शेखडिया गेहलोत (वय २८) व सूरज मांगीलाल गेहलोत (१८, दोघेही रा. नांदिया टोपलिया ता. झिरन्या जि. खरगोन मध्य प्रदेश) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यापैकी सूरज गेहलोत यास अटक करण्यात आली असून दिनेश हा फरारी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू, दिनेश आणि सूरज हे मोलमजुरी करीत असून गडमुडशिंगी येथील शांतीप्रकाश नगरमध्ये भाड्याने राहतात. सोमवारी रात्री जेवत असताना त्यांच्यात घरभाडे देण्यावरून वादावादी झाली. वादावादीचे रुपांतर भांडणात झाले. रागाच्या भरात मद्यधुंद अवस्थेतील दिनेश व सूरजने राजू याच्या डोक्यात दगड घातला. यामध्ये तो जागीच मरण पावला. दिनेश व सूरजने खुनाचा आरोप आपल्यावर येऊ नये या उद्देशाने राजूचा मृतदेह गांधीनगर स्टेशन परिसरातील रेल्वे रुळावर आणून ठेवला. रेल्वे त्याच्या मृतदेहावरून गेल्यानंतर डोके तुटून धडावेगळे झाल्याची खात्री पटल्यानंतर ते घरी आले.

काही वेळाने राजूचा नातेवाईक महेंद्र आत्मज ऐचला बर्डे याने राजू कुठे आहे अशी विचारणा केली. त्यावर या दोघांनीही मध्यप्रदेशमधील आपल्या मूळ गावी गेला असल्याचे सांगितले. पण या दोघांच्या कपड्यावर असलेले रक्ताचे डाग पाहून बर्डे याला संशय आला. त्याने सुरज व दिनेशला तुम्ही दोघांनी राजूला दगाफटका केला आहे का अशी विचारणा केली. त्या वेळी दिनेशने तेथून पळ काढला. मात्र बर्डे याने सूरजला पकडून ठेवले. सूरजने आम्ही दोघांनी राजूचा डोक्यात दगड घालून खून केला असल्याचे सांगितले. त्यानंतर बर्डे याने गांधीनगर पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली.

गांधीनगर रेल्वे स्थानकावर खून झाल्याची माहिती मिळताच करवीरचे प्रभारी पोलीस उपविभागीय अधिकारी मंगेश चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. अतिरिक्त पोलीस प्रमुख तिरुपती काकडे यांनी गांधीनगर ठाण्याला भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या. त्यानुसार या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दिनेशच्या शोधासाठी विशेष पथक सांगलीला रवाना झाले आहे. अधिक तपास सपोनि दीपक भांडवलकर करत आहेत.