गडहिंग्लज (प्रतिनिधी) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वसामान्य जनतेची सहनशीलता संपली आहे. ‘अत्यावश्यक’च्या नावाखाली किराणा, बेकरी, मटण-चिकन आणि भाजीपाला बाजारातील गर्दी प्रशासनाला दिसत नाही. कोल्हापूरला वेगळा न्याय आणि इतर तालुक्यांना वेगळा न्याय का..? त्यामुळे गडहिंग्लजमधील सर्व दुकाने सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी मनसेने केली आहे. याबाबतचे निवेदन आज (मंगळवार) प्रांताधिकारी विजया पांगारकर यांना देण्यात आले.  

निवेदनात म्हटले आहे की, गडहिंग्लजचे व्यापारी सभ्य आहेत, कायद्याचे पालन करणारे आहेत, प्रशासनाला महत्व देणारे आहेत. त्यामुळे कोल्हापूर शहरातील व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यास परवानगी मिळाली त्याचं धर्तीवर गडहिंग्लजमधील व्यापाऱ्यांनाही दुकाने उघडण्यास परवानगी मिळालीच पाहिजे. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना व्यापाऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर असेल असा इशारा देण्यात आला आहे.