शाहुवाडी (प्रतिनिधी) : शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे येथे आयुष्मान आरोग्य मंदिराच्या नूतन इमारतीचा भव्य लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय बोरगे यांच्या प्रयत्नातून तब्बल ४ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या सोहळ्याचे उद्घाटन आमदार विनयक कोरे आणि खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध पिंपळे होते.

या नूतन आरोग्य मंदिरामुळे बांबवडे आणि परिसरातील वाडी-वस्त्यांवरील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सेवा सुसज्ज पद्धतीने मिळणार आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना प्राथमिक ते आवश्यक उपचार एकाच छताखाली उपलब्ध होण्यासाठी ही इमारत मोलाची ठरणार आहे. उपस्थितांनी ग्रामीण आरोग्य सेवा मजबूत करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून आणि स्थानिक जनप्रतिनिधींच्या प्रयत्नांतून उभारण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. पुढील काळात आरोग्य मंदिर बांबवडे येथे सर्व प्रकारचे उपचार आणि आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देण्याचा संकल्प सर्वांनी व्यक्त केला.

यावेळी पंचायत समिती गटविकास अधिकारी मंगेश कुचेवार , तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एच. आर. निरंकारी, पंचायत समितीचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सहायिका, गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका, ग्रामस्थ उपस्थित होते.