कोल्हापूर ( प्रतिनिधी ) प्रदूषित पंचगंगा नदीच्या स्वच्छतेसह भुयारी गटारी प्रकल्प व रंकाळा तलावाच्या संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. साधारणता साडेतीनशे कोटी निधी मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. या संदर्भातील प्रस्तावांच्या मंजुरीसाठी पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांची भेट घेऊन याविषयी चर्चा केली.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेत पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. कोल्हापूर शहरात मोठ्या प्रमाणात नदी प्रदूषित होत आहे. त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

पावसाळ्यामध्ये शहरातील नाले भरून वाहत असल्यामुळे नदी जास्त प्रमाणात प्रदूषित होते. त्या दृष्टीने शहरामध्ये भुयारी गटार योजना आवश्यक आहे. या संदर्भात कोल्हापूर शहरातील नागरिकांकडून वारंवार जोरदार मागणी केली जात आहे. तरी; शासनाच्या अमृत -दोन योजनेअंतर्गत कोल्हापूर महापालिकेने 325 कोटी रुपयांचे प्रस्ताव शासनाकडे मंजुरीच्या मागणीकरिता पाठवलेले आहेत.

या सगळ्या प्रस्तावाचा पाठपुरावा करून लवकरच 340 कोटी इतका निधी आणण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. त्यामुळे पंचगंगा नदी प्रदूषणाचा गंभीर बनलेला प्रश्न कायमस्वरूपी सुटेल. तसेच; शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे . आरोग्याच्या दृष्टीकोनातून रोगाचे प्रमाण कमी होईल.