कोल्हापूर ( प्रतिनिधी ) वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या निर्देशानुसार सोमवार दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी, सकाळी 11 वाजता ताराराणी सभागृह, जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी लोकशाही दिन अंतर्गत ‘जनता दरबार’ आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती नुकतीच जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी आपले प्रश्न, अर्ज, निवेदन व अडचणी सोडविण्यासाठी जनता दरबारात उपस्थित रहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी केले आहे. सोबत आपल्या समस्यांविषयी लेखी अर्ज सोबत आणणे आवश्यक आहे.

बैठकीसाठी 54 विविध शासकीय विभाग उपस्थित राहणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभाग प्रमुख, महानगरपालिका कोल्हापूर, महानगरपालिका इचलकरंजी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, सर्व उपविभागीय अधिकारी, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, सहायक आयुक्त समाज कल्याण, सहाय्यक संचालक नगररचना शासकीय, सहायक आयुक्त अन्न, औषध प्रशासन विभाग अशा विविध विभागाचे विभाग प्रमुखही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे तक्रारी निराकरणासाठी लाभ घेण्याचं आवाहन पालकमंत्र्यांनी केलं आहे.