मुंबई / पुणे : अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेची पहिली प्रवेश यादी ३ ऑगस्टला जाहीर करण्यात येणार आहे. अकरावीचा अर्ज पूर्ण भरण्यासाठी आता बुधवारपर्यंत वेळ मिळणार आहे. सध्या अकरावीचा प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु असून, अर्ज भरण्यासाठी २७ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. राज्यात पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह मुंबई, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रातील अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने करण्यात येतात. 

पुण्यामध्ये अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला अखेर गती मिळाली आहे. एसएससी बोर्डाचा निकाल लागला तरी इतर बोर्डाचे निकाल लांबल्यामुळे अकरावी प्रवेश प्रक्रिया रखडली होती. आता इतर बोर्डांचेही निकाल घोषित झाल्यामुळे प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा सुरु झाला आहे. कवी प्रवेशासाठी पसंती क्रम नोंदविण्याची मुदत २७ जुलैपर्यंत आहे. २८ जुलैला सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर पहिल्या फेरीतील विद्यार्थ्यांना कोणत्या कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन मिळाले आहे, याची यादी तीन ऑगस्टला सकाळी दहा वाजता संबंधित पोर्टलवर प्रसिद्ध होणार आहे.

अकरावी प्रवेश प्रक्रियेत अल्पसंख्याक, संस्थांतर्गत अशा विविध कोट्यात प्रवेश देण्यात येतात. कोट्यांतर्गत प्रवेशाचे प्राधान्यक्रम नोंदविण्यासाठी २७ जुलैपर्यत मुदत देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी २८ जुलैला नियमानुसार जाहीर करण्यात येईल. ही यादी जाहीर झाल्यानंतर कोट्यातून प्रवेश घेऊन इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी २८ ते ३० जुलै या कालावधीत मिळालेल्या महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करायचा आहे.