कुरुंदवाड (प्रतिनिधी) : कुरुंदवाड पालिका निवडणुकीसाठीचा प्रारूप प्रभाग रचना आराखडा तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. द्विसदस्यीय दहा प्रभागाचा आराखडा तयार होत आला आहे. हा आराखडा निवडणूक आयोगाकडे सादर केला असून २० डिसेंबरला अंतिम प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब होणार आहे.

कुरुंदवाडच्या सन 2011 च्या जनगणनेनुसार 22 हजार 372 इतकी लोकसंख्या आहे. गेल्यावेळी पालिका निवडणुकीत मतदारांची संख्या 19 हजार 167 इतकी होती. विधानसभा निवडणुकीत 20 हजार 600 इतकी मतदार संख्या होती. यामध्ये 1 हजार 400 मतदारांची संख्या वाढली आहे. तीन नगरसेवकांची संख्या वाढणार असल्याने दोन प्रभाग वाढले आहेत. प्रत्येक प्रभागात सुमारे 2 हजार ते 2,100 मतदारांचा प्रभाग असणार आहे.

सन 2016 साली द्विसदस्यीय प्रभाग रचना झाली होती आणि जनतेतून नगराध्यक्ष निवडणूक झाली होती. 50 टक्के महिला आरक्षणानुसार  9 जागा महिलांसाठी तर 8 जागा पुरुषांसाठी राखीव होत्या. 1 महिला व 1 पुरुष असा द्विसदस्यीय प्रभाग होता. 8 प्रभागातून एकूण 17 सदस्य निवडून गेले होते. त्यापैकी 4 महिला व 2 पुरुषांचा मागास प्रवर्ग तर 1 महिला व 1 पुरुष अनुसूचित जाती जमातीसाठी अशा एकूण 8 जागा जातीय आरक्षित होत्या. तर उर्वरित 4 महिला व 5 पुरुष अशा 9 जागा सर्वसाधारण खुल्या होत्या. ओबीसी आरक्षणाच्या 27 टक्केच्या 50 टक्के प्रमाणे 1 आरक्षित जागा कमी होणार आहे. तर 9 मध्ये 3 जागा वाढणार असल्याने 12  सदस्यांच्या जागा सर्वसाधारण खुल्या असणार आहेत.

पालिकेची द्विसदस्यीय पद्धतीने निवडणूक होणार असल्याने इच्छुकांची सर्वच पक्षकडे मांदियाळी आहे. प्रभाग रचनेच्या पूर्णत्वानंतर खऱ्या अर्थाने पालिका निवडणुकीसाठी मैदान तापणार आहे. प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्यासाठी पालिकेचे मुख्याधिकारी निखिल जाधव, बांधकाम अभियंता योगेश गुरव, संगणक अभियंता प्रणाम शिंदे, निशिकांत ढाले, अमोल कांबळे, पूजा पाटील यांनी आराखडा पूर्ण केला आहे. त्यामुळे शहरात सध्या ठिकठिकाणी अशी प्रभाग रचना झाली आहे, हा प्रभाग असा फुटला आहे, ही मते या प्रभागात गेली आहेत अशी चर्चा रंगू लागली आहे.