कतार (वृत्तसंस्था) : जगातील सर्वात मोठा फिफा वर्ल्डकप रविवार, दि. २० नोव्हेंबरपासून सुरु होत असून, यात ३२ संघ सहभागी होणार आहेत. २९ दिवस चालणाऱ्या या महोत्सवात ६४ सामने खेळले जाणार आहेत. मुख्य म्हणजे प्रथमच मध्य पूर्वेतील देशात म्हणजे कतारमध्ये त्याचे आयोजन केले गेले आहे; परंतु अनेक दिग्गज खेळाडूंसाठी हा शेवटचा वर्ल्डकप ठरण्याची शक्यता आहे.

लियोनेल मेस्सी हा अर्जेन्टिनाचा चार वर्ल्डकप खेळलेला खेळाडू या कप नंतर पुन्हा वर्ल्डकपमध्ये दिसणार नाही, असे म्हटले जात आहे. मेस्सी ३४ वर्षांचा आहे आणि त्याने फिफा वर्ल्डकपमध्ये आत्तापर्यंत ६ गोल केले आहेत. २०१४ मध्ये त्याला गोल्डन बॉल अॅवॉर्ड मिळाले होते. दुसरा दिग्गज खेळाडू म्हणजे क्रिस्तियानो रोनाल्डो. पोर्तुगालचा हा महान कप्तान ३७ वर्षांचा झाला आहे आणि त्याने १७ सामन्यात ७ गोल केले आहेत. २००६ मध्ये पोर्तुगाल फिफा वर्ल्डकपमध्ये चौथ्या क्रमांकावर होते आणि तीच या देशाची सर्वोच्च कामगिरी आहे.

नेमार २०१४ मध्ये पहिला फिफा वर्ल्डकप खेळला. ब्राझीलचा हा सुपरस्टार ३० वर्षांचा आहे. एका मुलाखतीत त्याने कतार येथील फिफा वर्ल्डकप त्यांच्यासाठी शेवटचा असेल असे सांगितले आहे. रोबर्ट लेवनडोस्की या पोलंडच्या खेळाडूचा हा दुसरा वर्ल्डकप आहे. तो ३४ वर्षांचा असून, गेल्या वर्ल्डकपमध्ये त्याला एकही गोल नोंदविता आला नव्हता. लुईस सुव्रेज हा उरुग्वेचा खेळाडू ३५ वर्षाचा आहे. त्याने तीन वर्ल्डकप खेळले असून, १३ सामन्यात ७ गोल केले आहेत. त्याने प्लेअर ऑफ द मॅच अॅवॉर्ड मिळविले आहे.