मुंबई – सध्या राज्यात लोकसभा रणधुमाळी सुरु आहे. लोकसभा निवडणुक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. राज्यातील सर्व राजकीय पक्ष जोरदार प्रचाराला लागले आहेत. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते आपली आक्रमक भूमिका मांडताना पाहायला मिळत आहे. अशातच पवार – पवार कुटुंबियामधील वार प्रतिवार थांबायचे नाव घेत नाहीय . माजी कृषिमंत्री शरद पवारांना एक वक्तव्य गळ्याशी आल्याचं पाहायला मिळत आहे.काही दिवसापूर्वी शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना ‘बाहेरचा पवार’ असे संबोधलं होत. माजी कृषिमंत्री शरद पवारांच्या ‘बाहेरच्या पवार’ वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पलटवार केला होता . 4 दिवस सासूचे संपले, आता सुनेचे 4 दिवस येऊद्या, असा टोला अजित पवारांनी लगावला होता. आता पवार पवार यांच्या कोल्डवॉर मध्ये मुख्यमंत्री सुद्धा उत्तरल्याचं पाहायला मिळत आहे. शरद पवारांच्या त्या वक्त्यव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी कृषिमंत्री शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे..?

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ज्यांना लेकीत आणि सुनेत अंतर वाटते त्यांना मनातल्या मनात मांडे खाऊ द्या. ज्यांच्या मनात मांडे असतात त्यांच्या पदरात धोंडे पडल्याशिवाय राहणार नाही. सुनेत्रा पवार आणि अजित पवार बारामतीचा कायापालट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत, असे मतही मुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला महासत्ता बनवण्याचे स्वप्न पाहिले असून ते सत्यात उतरवण्यासाठी सुनेत्रा पवार यांना निवडून द्यावे लागेल. तीन उमेदवारांचे फॉर्म भरायला महाविकास आघाडीकडे आपल्यापेक्षा निम्मी गर्दी आहे. त्या तुलनेत आपला एक फॉर्म भरायला एवढी प्रचंड जनता येथे आली आहे, ही उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कामाची पोचपावती असून बारामतीमध्ये महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

‘या’ वक्त्याव्यावर शरद पवारांवर अजित पवारांचा निशाणा

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले , “ही वडीलधारी जरा, जुना काळ आठवत असेल, तर त्यांना म्हणा, जुना काळ आता थोडा बाजूला ठेवा. आता नवीन काळ बघा. आता सासूचे चार दिवस संपले, आता सूनेचे चार दिवस येऊद्या, असं सांगाना. की फक्त सासू-सासू-सासू, मग सुनेनं फक्त बघत बसायचं? बाहेरची-बाहेरची-बाहेरची, असं कुठं असतं का राव? असतं का? आपण घरची लक्ष्मी म्हणून त्यांच्याकडे बघतो. 40 वर्षे झाली तरी बाहेरची? किती वर्ष झाले मग घरची? सांगा आई बहिणीनों, बघा बाबा आता” अशा शब्दांत अजित पवारांनी शरद पवार यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं होत

आता यावर माजी कृषिमंत्री शरद पवार मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे