सोलापूर : माढा लोकसभा मतदार संघामध्ये भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपचे कमळ खाली ठेऊन शरद पवार गटात प्रवेश करत तुतारी हाती घेतली. धैर्यशील मोहितेंना उमेदवारी दिल्याने काही नेते नाराज झाले होते. त्यांनी बंडाचे निशाण हाती घेतले होते. यामध्ये डॉ. अनिकेत देशमुख आणि अभय जगताप यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. पण शरद पवारांनी बंडाचे निशाण फडकवणाऱ्या दोघांनाही थंड केलं आहे.

दरम्यान, एकीकडे डॉ. अनिकेत देशमुख यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत माढा लोकसभेची निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. पण शरद पवारांनी एका रात्रीत सूत्रे फिरवत अनिकेत देशमुखांचे बंड थंड करत धैर्यशील मोहिते यांचा प्रचार करणार असल्याचे सांगितले आहे. दुसरीकडे अभय जगताप यांनी उमेदवारी न मिळाल्याने निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. पण शरद पवार यांना अनिक्त देशमुख यांच्यानंतर अभय जगतापांचे बंड शमवण्यात यश आले आहे. त्यामुळे आता माढा लोकसभा मतदार संघामध्ये महायुतीच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे.

बंडाच्या भूमिकेमध्ये असलेल्या अभय जगताप यांनी आज माध्यमांशी संवाद साधत आम्ही साहेबांना एकटं सोडणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. त्याचसोबत ‘महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार.’ असल्याचे अभय जगताप यांनी सांगितले.

माढा लोकसभा मतदार संघात महविकास आघाडीकडून इच्छुक असणारे आणि शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असणारे उमेदवार अभय जगताप यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी जाहीर होताच बंडाचा पवित्रा घेतला होता. गेल्या काही दिवसांपासून ते नाराज असून बंड पुराकरणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. पण आता त्यांची मनधरणी करण्यात शरद पवारांना यश आले आहे.

शरद पवार यांनी मध्यस्थी करत अभय जगताप यांची समजूत काढली. अखेर माढ्यातील हे बंड थोपवण्यात शरद पवार यांना यश आलेले आहे. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या ताकदीमध्ये वाढ झाली आहे. असामध्ये महायुतीचे उमेदवार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या मात्र अडचणी वाढल्या आहेत. माध्यमांशी संवाद साधताना अभय जगताप यांनी सांगितले की, ‘या वाईट परिस्थितीमध्ये शरद पवारसाहेबांना एकटे सोडणार नाही.’ तसंच, ‘त्यांच्याबद्दल असणारी निष्ठा आम्ही कायम ठेऊ.’, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.