पुणे (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्र २०२०च्या प्रारूप विधेयकास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी २०२०-२१च्या अर्थसंकल्पात क्रीडा विद्यापीठाच्या स्थापनेची घोषणा केली होती. हे विधेयक आगामी विधिमंडळ अधिवेशनात सादर केले जाईल.

पुण्याच्या बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात हे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्या ठिकाणी खेळाच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा असल्याने क्रीडा विद्यापीठ उभारणे सोपे जाईल, असा सरकारचा मानस आहे. त्यामध्ये शारीरिक शिक्षण, क्रीडा विज्ञान, क्रीडा वैद्यकशास्त्र, क्रीडा तंत्रज्ञान, क्रीडा प्रशासन, क्रीडा व्यवस्थापन, क्रीडा माध्यम व कम्युनिकेशन, क्रीडा प्रशिक्षण यामध्ये शिक्षणाची आणि नोकरीची संधी उपलब्ध होईल.