धामोड (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यातील केळोशी बुद्रुकच्या उपसरपंचपदी तानाजी लहू कोदले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच वसंत गणपती जाधव यांचा निर्धारित कार्यकाळ संपल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. आज (बुधवार) सरपंच के. एल. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कोदले यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली.

सरपंच के. एल पाटील म्हणाले की, पाच वर्षाच्या कारकिर्दीत प्रभाग रचनेनुसार या पदासाठी जास्तीत जास्त सदस्यांना संधी मिळावी हा मानस असून यासाठी एक-एक वर्षाचा कालावधी ठेवला आहे. आता रोटेशननुसार कोदले पाचव्या सदस्याला ही संधी प्राप्त झाली आहे. बिनविरोध निवडीचा पायंडा कायम ठेवला आहे.

निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी दिपक बागडी यांनी काम पाहिले. या वेळी सर्व सदस्य, प्रमुख कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.