कोल्हापूर (प्रतिनिधी) : शासनाचे सदोष धोरण आणि विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील सर्व इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळा उद्या (दि. ७) लाक्षणिक बंद पाळणार आहेत. अशी माहिती इंग्लिश मिडीयम स्कूल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष महेश पोळ यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

पत्रकात म्हटले आहे की, इंग्रजी माध्यमांच्या शाळांबाबत शासनाने घेतलेल्या सदोष धोरणाबाबत राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून त्यासाठीच एक दिवस शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. राज्य शासनाने २५ टक्के विद्यार्थ्यांचा फी परतावा ताबडतोब द्यावा. राज्य शासनाने २५ टक्के प्रवेशित विद्यार्थ्यांची फी ८ हजार केली असून ती रद्द करून केंद्र शासनाप्रमाणे २६ हजार ९०८ आणि गणवेशासाठी १,१०० रुपये करावी.

कोविड संचारबंदीमुळे सधन पालकांनीही फी न भरल्याने शाळांचे आर्थिक नुकसान होत असून त्यासाठी राज्य शासनाने आर्थिक तरतूद करावी. लॉकडाऊनमुळे लाखो शिक्षकांची होणारी उपासमार थांबवावी. केंद्र आणि राज्य शासनाने माहितीच्या अधिकारात दिलेल्या माहितीनुसार ३८१६.५८ कोटींची तफावत आढळून येते, याबाबत चौकशी समिती नेमावी. शाळा सुरू करण्याबाबत धोरण निश्चित करावे. अशा मागण्या असोसिएशनतर्फे करण्यात आल्या आहेत.

या पत्रकावर महेश पोळ, असोसिएशनचे उपाध्यक्ष नितीन पाटील, सचिव गणेश नायकुडे यांच्या सह्या आहेत.