मुंबई – देशभरात गेल्या काही दिवसांपासून हवामानामध्ये सातत्यानं बदल होताना दिसत आहेत. कधी पाऊस, कधी उन्हाळा, कधी थंडी पाहायला मिळत आहे. हवामानातील या बदलांचे थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहेत. अशातच सध्या महाराष्ट्रात एक संसर्गजन्य आजार हातपाय पसरत आहे. त्यामुळे नागिरकांनी काळजी घेण्याची गरज आहे.मान्सूनच्या सुरुवातीपासूनच मुंबईमध्ये मलेरिया, डेंग्यू आणि लेप्टोसारख्या साथीच्या आजारांचे रुग्ण आढळतच आहे. अशातच स्वाईन फ्लू या आजाराने सुद्धा थैमान घालायला सुरुवात केली आहे..

स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ :

राज्यासह मुंबईत सध्या स्वाईन फ्लूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरत आहे. यासंदर्भात राज्यातील आरोग्य विभागाने आकडेवारी देखील दिली आहे. दिलेल्या आकडेवारीनुसार, यावर्षी 15 जूनपर्यंत राज्यात तब्बल 432 स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळले आहेत, ज्यापैकी 15 रुग्णांनी या संसर्गामुळं जीव देखील गमावला आहे.

काय आहेत स्वाईन फ्लू ची लक्षणं?

कोरोना विषाणूनंतर राज्यात स्वाईन फ्लू आजार डोकं वर काढत आहे. त्यामुळे ताप, सर्दी खोकला, अंगदुखी, घशात खवखव हे लक्षणं आढळल्यास नागरिकांना वैद्यकिय सल्ला घेण्याचा सल्ला आरोग्य विभागाकडून देण्यात आला आहे. दरम्यान सध्या आढळणाऱ्या स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये किमान वेळेतच प्रकृती सुधारणाऱ्या रुग्णांचा आकडा मोठा असल्यामुळं नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन आरोग्य यंत्रणेकडून करण्यात आली आहे.

स्वाईन फ्लू हा संसर्ग H1N1 च्या नावानंही ओळखला जाणार आजार आहे. एखाद्या व्यक्तीच्या थुंकण्यातून, शिंकण्यातून किंवा खोकण्यातून या विषाणूंचा संसर्ग फैलावत आहे. तसेच जर नागरिकांना श्वसनास त्रास, थकवा, खोकला, शिंका येणं, सर्दी, घशात खवखव, मांसपेशींमध्ये वेदना, ताप असे लक्षणे आढळली तर योग्य काळजी घ्या.