कोल्हापूर (प्रतिनिधी) : सध्याच्या युगात दूरध्वनी आणि इंटरनेट सेवेला असाधारण असे महत्त्व आहे. त्यामुळे दूरध्वनी सेवेसंदर्भात ज्या काही अडचणी आहेत, त्याचा सर्व्हे करून येत्या १५ दिवसांमध्ये अहवाल देण्याच्या सूचना खासदार संजय मंडलिक यांनी बीएसएनएलसह इतर खाजगी सेवा पुरवणाऱ्या दूरध्वनी कंपन्याना केली. काल (शुक्रवार) या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी खासदार मंडलिक बोलत होते.

 

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, आजरा, गडहिंग्लज, गगनबावडा आदी तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये बीएसएनएल सेवेबरोबरच इतर खाजगी दूरध्वनीसेवा पुरवणाऱ्या कंपन्यांच्या सेवेचा बोजवारा उडाला आहे. अनेक वेळा नेटवर्क गायब होणे, याशिवाय इंटरनेटला स्पीड नसणे, अशा बाबी वारंवार उद्भवत आहेत. अनेक वेळा तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याने खासदार संजय मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली दूरध्वनी कंपन्यांची बैठक शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली होती.

दूरध्वनी सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांना कोणत्या अडचणी आहेत, याशिवाय ग्रामीण भागात नेमक्या काय समस्या आहेत याची माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली. रेंज नसल्या कारणाने एका फोनवर होणाऱ्या कामासाठी पूर्ण दिवस वाया जातो, कॅाल ड्रोप होणे, कोविड महामारीमुळे सध्या शिक्षण ऑानलाईन पध्दतीने सुरू असून मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या वर्कर्सचे वर्क फॅार्म होम सुरु आहे.  या बैठकीत खाजगी कंपन्यांकडून देखील त्यांचे असणारे मोबाईल टॉवर्स आणि ग्रामीण भागामध्ये देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये येणाऱ्या अडचणी, यांची माहिती त्यांनी घेतली.

या बैठकीसाठी आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, जिल्हा परिषदेचेमाजी शिक्षण सभापती अभिजीत तायशेटे, गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्षअभय देसाई, आदींची प्रमुख उपस्थिती होती. तसेच बीएसएनएलचे उपमुख्य महाप्रबंधक शिवराम कुलकर्णी, आरएफओ माळी, मंडल अभियंता स्नेहा विचारे, यांच्यासह जीओचे आकाश सावंत, एअरटेलचे उज्वल  जावळेकर आदी उपस्थित होते.