कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील आसगांव येथील सर्जेराव सखाराम पाटील-कळेकर (वय ५८) यांनी २४ जून रोजी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांचा उपचारादरम्यान काल सकाळी मृत्यू झाला. मात्र, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील यांचा वेसर्डे (ता. गगनबावडा) येथे उसाची मळी आणि बगॅसपासून इंधन तयार करण्याचा कारखाना होता. या व्यवसायामुळे त्यांच्यावर बँका, पतसंस्था आणि खासगी सावकारांचे मोठे कर्ज झाले होते. त्यामुळे ते काही दिवसांपासून तणावात होते. त्यांनी राहत्या घरी कीटकनाशक प्राशन केले. त्यानंतर उलट्या होऊ लागल्याने कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा एक मुलगा राजस्थान येथे सैन्यसेवेत आहे. तो येईपर्यंत पाटील यांचा मृतदेह शीतगृहात ठेवण्यात आला होता.