कोल्हापूर(प्रतिनिधी) : कोणत्याही अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यावर आपल्याला चांगली नोकरी मिळावी असे प्रत्येक विद्यार्थ्याला वाटते; पण नोकरी करणारे होण्याऐवजी नोकरी देणारे व्हा. त्यातून तुमची वैयक्तिक प्रगती तर होईलच शिवाय समाजाच्या प्रगतीला हातभार लावल्याचे समाधान नक्की मिळेल, असे प्रतिपादन उद्योजक संदीप साळोखे यांनी केले.

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा येथे उद्योजकता विकास कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी डॉ. महादेव नरके, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागप्रमुख नितीन माळी उपस्थित होते.

साळोखे म्हणाले, अभियांत्रिकी शिक्षण घेताना आपण करिअर म्हणून स्वतः काही व्यवसाय करू शकतो का? याचा विचार करावा. नवीन शिकण्याची इच्छा, आर्थिक नियोजन, वेळेचे महत्व या गोष्टींची सवय लावून घ्यावी. सध्या स्टार्टअपच्या माध्यमातून वेगवेगळ्या संधी आहेत. त्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रोत्साहन दिले जात आहे. आपली इच्छा शक्ती आणि कष्ट करण्याची तयारी असेल, तर आपण उद्योग-व्यवसायात सुद्धा यशस्वी होऊ शकतो, असेही त्यांनी म्हणाले. नवीन व्यवसाय करताना प्रोजेक्ट रिपोर्ट कसा करावा, आवश्यक फायनान्स कसा मिळवावा याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. महादेव नरके यांनी विद्यार्थ्यांमध्ये उद्योग आणि व्यवसाय करण्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम आयोजित केल्याचे सांगितले. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागप्रमुख नितीन माळी यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली.