बंगळुरू (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने देशभरात भीतीचे वातावरण आहे. कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. तरीही दिवसेंदिवस हा आकडा वाढत असल्याने प्रशासकीय यंत्रणांवर ताण वाढू लागला आहे. काही राज्यांनी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेतला तर काही राज्यांनी कडक निर्बंध लादले आहेत. आता कर्नाटक सरकारनेही लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून (२७ एप्रिल) १४ दिवसांचा लॉकडाऊन राज्यात असणार आहे. उद्या रात्रीपासून निर्बंध लागू होणार आहेत, अशी  घोषणा मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी आज (सोमवार) केली.  

मुख्यमंत्री येडियुरप्पा अत्यावश्यक सेवांना या लॉकडाऊनमधून सूट देण्यात आली आहे. दुकानं सकाळी ६ ते सकाळी १० पर्यंत अर्थात ४ तास सुरू असतील. त्यानंतर दुकानं बंद असतील, असं जाहीर करण्यात आलं आहे. त्या व्यतिरिक्त इतर सेवा पूर्णपणे बंद असतील असं सांगण्यात आलं आहे. तर बांधकाम, शेती आणि उत्पादन क्षेत्राला परवानगी असणार आहे. सार्वजनिक वाहतूक बंद असणार आहे. त्याचबरोबर राज्य आणि राज्याबाहेर यात्रा करण्याची परवानगी नसेल. अत्यावश्यक प्रकरणात सूट दिली जाईल, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. त्याचबरोबर दारूच्या होम डिलिव्हरीलाही मंजुरी देण्यात आली आहे.

कर्नाटकमध्ये आतापर्यंत १४ हजारांहून अधिक जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. कर्नाटकमध्ये एका दिवसात २९,४३८ रुग्णांची नोंद झाली तर एकाच दिवसात २०८ जणांनी प्राण गमावले. यामुळे आरोग्य यंत्रणेसह प्रशासन धास्तावले. परिस्थिती आणखी विकोपाला जाऊ नये, यासाठी अखेर सरकारला लॉकडाऊनची घोषणा करावी लागली.