कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरातील सर्वाधिक व्यवसाय करणारा एरिया म्हणजे राजारामपुरी आहे. मात्र या ठिकाणी अद्याप साठ वर्षांपूर्वीचा ड्रेनेज लाईन आहेत. सर्वाधिक कर देऊनही इथे सुविधा दिली जात नाही. महापालिकेने राजारामपुरी येथील ड्रेनेज लाईनसाठी विशेष पॅकेज द्यावे. यातून राजारामपुरीत सर्वत्र 24 इंच ते 30 इंची अशी ड्रेनेज लाईन टाकावी, अशी मागणी शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे यांनी केली. यासंदर्भातील निवेदन महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटलं आहे की, राजारामपुरीतून महापालिकेकडे दरवर्षी सुमारे दहा कोटींच्यावर घरफाळ्यास इतर कर जमा होतो. सद्यस्थितीत येथे बंगल्याच्या ठिकाणी अपार्टमेंट उभारल्या आहेत. एका बंगल्याच्या जागेत आता 30 ते 50 फ्लॅट तयार झाले आहेत. मोठे मोठे शोरूम दुकान गाळे झाले आहेत. मात्र, ड्रेनेज लाईन ही सन 1967 ला चार इंच होती तेवढीच आहे. परिणामी दररोज राजारामपुरीत सांडपाणी रस्त्यावरून वाहत असते. त्यामुळे आता मोठ्या ड्रेनेज लाईनची गरज आहे.
राज्य शासनाच्या निधीतून महापालिकेच्या वतीने शहरातील ड्रेनेज लाईन नसलेल्या भागात ड्रेनेज लाईन टाकण्यात येत आहे. त्यानंतर राजारामपुरी परिसरातील सम्राट नगर, प्रतिभा नगर, विद्यापीठ परिसर इतरत्र मोठी ड्रेनेज लाईन टाकली जात आहेत. मात्र, त्या ड्रेनेज लाईन राजारामपुरीतील नवीन लाईनला जोडण्यात येणार आहेत. त्या जोडल्यास त्याचे काय होईल, त्या सर्व भागांचा लोड राजारामपुरी ड्रेनेज लाईनवर येणार आहे. त्यासाठी महापालिकेने बांधकाम परवानगी देतानाच ड्रेनेज फंडाची तरतूद करावी. अन्यथा जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.