अमरावतीकर माझ्या कुटुंबाचे सदस्य

अमरावती : उद्धव ठाकरे घाबरले असल्याने त्यांनी अमरावतीत उमेदवार दिला नाही असा टोला भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांनी लगावला आहे. अमरावतीमध्ये येणारं टेक्सटाइल पार्क रोखल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केलाय.तसंच अमरावतीमध्ये येणारं टेक्सटाइल पार्क रोखल्याचा गंभीर आरोपही केला. अमरावतीत आयोजित प्रचारसभेत त्या बोलत होत्या. यावेळी देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळेही मंचावर उपस्थित होते.

“अमरावतीकर माझ्या कुटुंबाचे सदस्य आहेत. मी कधीच मर्यादा सोडून बोललेली नाही आणि ती संस्कृतीही नाही. माझ्या बापाचं नाव काढतात. माझ्या वडिलांनी सीमेवर देशासाठी योगदान दिलं. छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर माझे खरे बाप आहेत. त्यांचे विचार घेऊन मैदानात उतरत आहे. माझा बाप काढणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी महिला, शेतकरी, शेतमजूर पुढे येतील,” असा निर्धारही नवनीत राणा यांनी व्यक्त केला.

“एका बाईवर किती अत्याचार करता. हनुमान चालिसा म्हणते असं म्हटल्याने मला 14 दिवस जेलमध्ये टाकलं होतं. आपल्यापेक्षा लहान लोकांना जेलमधये टाकून तुम्ही मोठे होत नाही. बरोबरीच्या व्यक्तीशी लढून दाखवा. माझा सोन्याचा चमचा घेऊन जन्म झाला नाही. स्वतःचं ताट स्वतः तयार केले आहे. उद्धव ठाकरे माझ्याविरोधात आज उमेदवार उभा करायला घाबरत आहेत. अमरावती पाहिजे असं बोललेही नाही. उद्धव ठाकरे घाबरले असून, दुसऱ्या पक्षाला उमेदवारी दिली,” असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे.